अंबरनाथमधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शूटिंग रेंजचे उद्घाटन

अंबरनाथमधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शूटिंग रेंजचे उद्घाटन

shooting Range

अंबरनाथमध्ये सव्वा एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे शुटिंग रेंज साकारण्यात आले असून आज, ८ जानेवारी रोजी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या नेमबाज अंजली भागवत आणि दीपाली देशपांडे शिरसाट उपस्थित राहणार आहेत.महाराष्ट्रात काही ठिकाणी १० मीटरचेच शूटिंग रेंज उपलब्ध आहेत. जागतिक शूटिंग स्पर्धांमध्ये खेळाडूंना भाग घेण्यासाठी आवश्यक असलेली २५ मीटर आणि ५० मीटरची रेंज फक्त मुंबईत वरळी येथे उपलब्ध आहे. त्यामुळे अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर तसेच लगतच्या ग्रामीण भागातील उदयोन्मुख नेमबाज खेळाडूंना सरावासाठी मुंबईपर्यंत प्रवास करावा लागत होता.

अनेक खेळाडूंना आर्थिक परिस्थितीमुळे मुंबईपर्यंत जाणे शक्य नव्हते. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी खेळाडूंची ही अडचण लक्षात घेऊन अंबरनाथ शहरात जागतिक दर्जाचे शूटिंग रेंज साकारले आहे. खासदारांनी यासाठी २०१५ पासून सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच खासदार निधीही उपलब्ध करून दिला. विम्को नाका, अंबरनाथ पश्चिम येथील नगर परिषदेच्या सुमारे सव्वा एकर जागेवर १० मीटर, २५ मीटर आणि ५० मीटरचे जागतिक दर्जाचे शूटिंग रेंज साकारण्यात आले आहे. सुमारे अडीच कोटी रुपये यासाठी खर्च करण्यात आले असून खासदार निधी, डॉ. बालाजी किणीकर यांचा आमदार निधी आणि अंबरनाथ नगर परिषदेचा निधी यांद्वारे हा प्रकल्प साकारण्यात आला आहे.

कल्याणात सिटी पार्कचे भूमिपूजन

स्मार्ट सिटी अंतर्गत कल्याण पश्चिमेत सिटी पार्क साकारण्यात येणार असून त्याचे भूमिपूजन आज दुपारी ३ वाजता युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सिटी पार्क हा शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या वचननाम्यातही या प्रकल्पाचा समावेश होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका स्तरावर वारंवार बैठका घेऊन या प्रकल्पातील अडचणी दूर केल्या आहेत.

First Published on: January 8, 2019 5:00 AM
Exit mobile version