चमत्कार: जन्मानंतर १८ दिवसांनी बाळ प्यायले दूध, नाव ठेवले टायगर

चमत्कार: जन्मानंतर १८ दिवसांनी बाळ प्यायले दूध, नाव ठेवले टायगर

जन्मानंतर १८ दिवसांनी दूध प्यायलेला हाच तो टायगर

उल्हासनगरमधील वडोल गावच्या नाल्यालगत १८ दिवसांपूर्वी एक बेवारस अर्भक आढळून आले होते. त्याची प्रकृती खालावली असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्याची मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र, आज तब्बल १८ व्या दिवशी त्याने दूध प्यायले. यामुळे सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद दिसून आला. या बाळाने दूध प्यायल्याने रूग्णालयातील डॉक्टरांसह त्याच्या उपचाराचा खर्च उचलणारे शिवाजी रगडे आणि त्यांचे कुटूंबीय भारावून गेले आहेत. या बालकाचे रुग्णालयातच नामकरण करण्यात आले असून सर्वांनी त्याचे नाव टायगर असे ठेवले आहे.

जन्मलेल्या नवजात अर्भकाला १८ दिवसांपूर्वी काळ्या पिशवीत बांधून निर्दयी मातेने वडोलगावच्या नाल्यात फेकल्याची घटना उल्हासनगरात घडली होती. त्या अर्भकाला समाजसेवक शिवाजी रगडे यांनी उल्हासनगरातील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्या बाळाची प्रकृती चिंताजनक बनल्याने बाल न्यायालयाने पोलिसांना खासगी रुग्णालयातील उपचारासाठी परवानगी दिली होती. या बाळाला वाचवण्याकरिता जो वैद्यकीय खर्च येणार त्याची जबाबदारी शिवाजी रगडे यांनी घेतली आहे. त्याअनुषंगाने पोलीस-डॉक्टरांच्या उपस्थितीत या बाळाला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्बल १८ दिवस त्या बालकावर सलाईनद्वारे उपचार सुरू होते.

रूग्णालयातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह रगडे कुटुंबही त्या बालकाची काळजी घेत आहे. प्रत्येकाला ते लहान बाळ केव्हा धोकादायक स्थितीतून बाहेर येते याची उत्सुकता होती. खाजगी रूग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नाने त्या बाळाला पुनर्जन्म मिळाला. याशिवाय त्या बाळाला तब्बल १८ दिवसांनी दूध पाजण्यात आले. त्यामुळे त्या बालकाच्या चेहऱ्यावर प्रसन्नता पाहून सर्वांनाच आनंद झाला आहे.

First Published on: January 20, 2019 3:19 PM
Exit mobile version