‘कंदील’ जे देणार ‘गड-किल्ल्यांची’ माहिती

‘कंदील’ जे देणार ‘गड-किल्ल्यांची’ माहिती

दिवाळी म्हणजे आनंदासोबत रोषणाईचा सण. सध्या याच दिवाळ सणाची जोरदार तयारी सुरू असून, बाजारपेठा फटाक्यांनी, दिव्यांच्या रोषणाईने आणि विविध प्रकारच्या कंदिलनी सजल्या आहेत. लालबाग परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून मखर बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नानासाहेब शेंडकर यांनी यावेळी दिवळीसाठी आगळे-वेगळे कंदील तयार केले आहेत.  छत्रपती शिवाजी महारांजांनी बांधलेले गड-किल्ले पाहण्यासाठी अनेक पर्यटक जात असतात. मात्र, नानासाहेबांच्या मते आपले गड-किल्ले जतन करण्याचा संदेश अधिकाधिक तरुणांपर्यंत पोहचवणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे या खास कंदिलाद्वारे त्यांनी महाराष्ट्रातील गड-किल्ले जतन करण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. नानासाहेबांनी तब्बल १० हजाराहून अधिक हे खास कंदील बनलवले असून, लवकरच विक्रीसाठी ते बाजारात येणार आहेत.

कदिलाचं वैशिष्ट्य काय

कागदापासून बनवण्यात आलेल्या या कंदिलांवर महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे जतन करा असा संदेश देण्यात आला आहे. याशिवाय महाराजांनी बांधलेल्या ४ किल्ल्यांची छायाचित्रंसुद्धा कंदिलावर छापण्यात आलेली आहेत. याशिवाय महाराजांच्या सन्मानाप्रित्यर्थ काही चारोळीही छापण्यात आल्या आहेत. माात्र, या कंदिलावर कुठेही जय शिवाजी, जय भवानी किंवा छत्रपती शिवाजी महाराज की जय असे उद्घोष छापण्यात आलेले नाहीत. याविषयी आपलं महानगरशी बोलताना नाना शेंडकर यांनी सांगितलं, की ‘महाराजांच्या नावाचा वापर विविध माध्यमातून केला जातो. मात्र महाराजांनी ज्या किल्ल्यांची निर्मिती केली त्याचं योग्य जतन होताना दिसत नाही. त्यामुळेच या कंदीलवर महाराजांच्या नावाचा उल्लेख टाळण्य़ात आला आहे.’

अशी सुचली कल्पना

२० वर्षांपासून नानासाहेब शेंडकर इंग्लडला असताना त्यांनी तिथल्या एका किल्ल्याला भेट दिली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील किल्ले जतन करण्याबाबतची माहिती, आपल्या कलेच्या माध्यमातून तरुणांपर्यंत पोहोचवण्याचा मानस केला. यावर्षी पहिल्यांदाच कंदील बनवत असताना त्यांनी आपली ही कल्पना सत्यात उतरवली. या संकल्पनेवर ते गेल्या सहा महिन्यांपासून काम करत असून, आता लोकांचा प्रतिसाद पाहता आपल्या मेहनतीचं चीज झाल्याचं त्यांनी आपलं महानगरशी बोलताना सांगितलं.

बच्चे कंपनीसाठी छोटे कंदील

दिवाळीमध्ये सर्वाधिक मज्जा असते ती बच्चे कंपनीची. त्यामुळे मोठ्या कंदीलांसोबत त्यांनी बच्चेकंपनीसाठीही ५ हजार कंदील बनवले आहेत. बच्चे कंपनीसाठी बनवलेल्या एका कंदीलची किंमत ६० रुपये असून, कदम १०० कंदील घेतले तर  एक कंदिल ३८ रुपयांना मिळणार आहे. दरम्यान, राज्य सरकारने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतल्यामुळे यावर्षी कागदी कंदीलला जास्त महत्व प्राप्त झाले असून, नान शेंडकर यांनी बनवलेल्या कंदीलांना आतापासूनच चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

परदेशातून कंदिलांना मागणी

नानासाहेब शेंडकर यांनी जशी सोशल मीडियावर या कंदीलची जाहीरात दिली तशी त्यांच्या कंदिलला विविध भागातून मागणी येऊ लागली आहे. सध्या लंडन, अमेरिका, दुबई आणि मॉरिसेसमधूल त्यांच्या कंदीलला मागणी आली आहे. एका कंदिलाची किंमत १९९ रुपये इतकी आहे. हा कंदील बनवायला ३०० रुपये खर्च आला असला तरी ना नफा ना तोटा या तत्वावर हे कंदील विकणार आहे. लोकांचा सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत असून, हे कंदील बनवण्यासाठी कंपनीचे १०० कर्मचारी कामाला लावले असून, मागणी वाढली तर त्यानुसार अजून कंदील बनण्यात येणार असल्याचं नानासाहेब शेंडकर यांनी आपलं महानगरशी बोलताना सांगितलं.

First Published on: October 25, 2018 7:30 AM
Exit mobile version