विमा एजंट बनला बोगस टीसी, पहिल्याच दिवशी बेड्या!

विमा एजंट बनला बोगस टीसी, पहिल्याच दिवशी बेड्या!

लॉकडाऊनमुळे विमा एजंटचा व्यवसाय ठप्प पडला असताना दोन दिवसांपूर्वीच या एजंटला स्टेशनवर टीसीने विदाऊट तिकीट पकडले. यातूनच या एजंटला आयडीया सुचली आणि तो बोगस आयकार्ड तसेच पावती बूक तयार करून टीसी बनला. मात्र, त्याचा हा कारनामा एक दिवस सुद्धा चालू शकला नाही. पहिल्या दिवशीच रेल्वे पोलिसांच्या तावडीत सापडला. अशरफ अली या विमा एजंटवर रेल्वे पोलिसांकडून बेड्या हाती पडण्याची वेळ आली.

कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी राजू आखोडे आणि त्यांचे काही सहकारी कल्याण रेल्वे स्टेशनवर गस्त घालत असताना त्यांची नजर एका टीसीवर गेली. काळा कोट आणि पांढरा शर्ट घालून आणि हाती पावती बूक घेऊन हा टीसी प्रवाशांची तिकीट तपासणी करीत होता. त्याचे हावभाव पाहून पोलिसांना संशय आला. अखेर पोलिसांनी एका टीसीला पाचारण केले. त्या टीसीसोबत पोलिसांनी या व्यक्तीची विचारपूस सुरू केली आणि काही वेळात हे समोर आले की, हा बोगस टीसी आहे. कल्याण रेल्वे पोलिसांनी या बोगस टीसीला ताब्यात घेतले.

अशरफ अली असे या व्यक्तीचे नाव असून तो भांडूप येथे राहतो. अशरफ हा विमा एजंट आहे. हा धंदा ठप्प पडल्याने तो आर्थिक विवंचनेत होता. दोन दिवसांपूर्वी तो काही कामानिमित्त जात असताना इगतपुरी स्टेशनला त्याला एका टीसीने पकडले. त्याच्याकडे तिकीट नसल्याने त्याला दंड ठोठावला. या घटनेतून त्याला युक्ती सुचली. त्याने गुगलच्या सहाय्याने बोगस आयकार्ड तयार केले.

शिवाय त्याच्याकडे दंडात्मक कारवाई करत ज्या टीसीने पावती फाडली होती ती सुद्धा त्याच्याकडे होती. याच पावतीच्या आधारे बोगस पावती पुस्तक तयार केले. टीसीचे कपडे परिधान करून कल्याण स्थानकात पोहोचला. पहिल्या दिवशीच त्याच्या या कृत्याचा पर्दाफाश झाला आणि तो पकडला गेला असल्याचे कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी सांगितले.

First Published on: May 5, 2021 5:30 AM
Exit mobile version