ठाणे कारागृहात इक्बाल कासकरची नाकेबंदी

ठाणे कारागृहात इक्बाल कासकरची नाकेबंदी

इक्बाल कासकर

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा लहान भाऊ इक्बाल कासकर २ वर्षापासून ठाणे कारागृहात बंदिस्त आहे. कारागृहातून न्यायालयात अथवा हॉस्पीटलमध्ये नेताना कासकर नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडला. त्यामुळे कासकरच्या अनेक गोष्टींना कात्री लावण्यात आली असून, कारागृहातच त्याची नाकेबंदी करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. दोन दिवसांपूर्वीच इक्बालचा मुलगा रिझवानला मुंबई पोलिसांनी अटक केल्याने खळबळ उडाली आहे. दाऊद हा दुबईतून सूत्रे हलवित असताना मुंबईची सूत्रे ही इक्बालच्या हाती आली होती. त्यामुळे वडिलांच्या अटकेनंतर रिझवानच डी कंपनीची सूत्रे हलवित होता का? असाच प्रश्न त्याच्या अटकेनंतर उपस्थित होत आहे.

पाच पोलिसांचे निलंबन

ठाणे खंडणी विरोधी पथकाने खंडणीच्या तीन गुन्ह्यात इक्बाल कासकरला अटक केली आहे. इक्बालवर मोक्कांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या इक्बाल हा ठाणे मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहे. इक्बाल मधुमेह, रक्तदाब यांसारख्या गंभीर आजाराने त्रस्त आहे. इक्बाल हा सहकाऱ्याच्या आधाराशिवाय चालू शकत नाही अशी अवस्था असल्याचेही सूत्रांकडून समजले. काही दिवसांपूर्वी इक्बाल हा खाजगी गाडीत बसून बिर्याणी खात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे इक्बालला विशेष वागणूक देणाऱ्या पाच पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

हेही वाचा – भाजप सरकारला प्रियांका गांधींची भीती वाटते – बाळासाहेब थोरात

इक्बालनंतर रिझवानचे नाव

इक्बालला घरचे जेवण द्या आणि हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करा ही त्याची मागणीही धुडकावण्यात आली आहे. दाऊद हा दुबईतून सूत्रे हलवित असला तरीपण भारतात विशेषत: आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मुंबईत डी कंपनीचा म्होरक्या कोण? अशी चर्चा नेहमीच रंगत असे. छोटा शकिलने वेगळे बस्तान थाटल्यानंतर दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर आणि बहीण हसीना पारकर यांची नावे नेहमीच चर्चेत होती. हसीना पारकर हिचे निधन झाल्यानंतर इक्बालचे नाव प्रकर्षाने पुढे आले. मात्र इक्बालनंतर आता रिझवानचे नाव पुढे आले आहे.

रिझवानची वडिलांशी भेट?

ठाणे मध्यवर्ती कारागृहात इक्बाल कासकर याला भेटण्यासाठी त्याचा मुलगा रिझवान आल्याची चर्चाही खूप रंगली होती. मात्र इक्बालला त्याचे कोणते नातेवाईक भेटण्यासाठी आले होते, याबाबत संभ्रम आहे. इक्बाल दोन वर्षे कारागृहात बंदिस्त असल्याने डी कंपनीची सूत्रे रिझवान चालवीत होता का?, असाही प्रश्न त्याच्या अटकेनंतर निर्माण झाला आहे. यापूर्वी डी कंपनीशी रिझवानचा फारसा संबंध आलेला नाही. देशाबाहेर पळून जात असतानाच अचानक रिझवानला अटक केल्याने त्याचे डी कंपनीशी संबंध असल्याचे स्पष्ट होत आहे. इक्बालची प्रकृती ठीक नसल्याने वडिलांकडून रिझवानने डी कंपनीची सूत्रे हाती घेतली का?, असाही अंदाज यानिमित्त व्यक्त केला जात आहे.

First Published on: July 19, 2019 8:34 PM
Exit mobile version