सुरुंग स्फोटाने वरंडोली, वाळसुरे गावांना हादरे

सुरुंग स्फोटाने वरंडोली, वाळसुरे गावांना हादरे

ग्रामस्थांच्या घरांना तडे

किल्ले रायगड परिसरात रायगड प्राधिकरणच्या माध्यमातून विविध कामे नियम पायदळी तुडवून केली जात आहेत. किल्ले रायगड परिसरात असलेल्या वरंडोली आणि वाळसुरे गावच्या हद्दीत डबर खाणीच्या सुरुंग स्फोटांनी गावातील घरांना तडे गेले. यामुळे या विभागातील नागरीकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. या प्रकरणी महाड महसूल विभागात तक्रार दाखल होऊनही कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

किल्ले रायगड ही एक संरक्षित वास्तू असून ती भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. कायद्यानुसार रायगडच्या परिसरात कोणत्याही प्रकारची उत्खनन आणि स्फोटके लावण्यास बंदी आहे. तसेच वरंडोली हे गाव इको सेन्सिटीव्ह झोनमध्ये आहे. मात्र या कायद्याची पायमल्ली करुन एम.बी.पाटील या ठेकेदाराने वाळसुरे आणि वरंडोली या किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या गावात डबर खानीचे खोदकाम सुरु केले आहे. मोठ्याप्रमात खडी आणि क्रश सॅन्ड निर्मीतीचा प्रकल्प या ठिकाणी उभारण्यात आला आहे.

यासाठी लागणारा दगड जवळील खानीतून काढण्यात येतो. सदर दगड काढण्यासाठी या भागात मोठ्या प्रमाणात सुरुंग स्फोट ( ब्लास्टींग ) केले जात आहे. या स्फोटासाठी भुगर्भात ७५ मिमी व्यासाचे होल मारुन यामधून शक्तीशाली स्फोटकांच्या सहाय्याने स्फोट घडवून आणले जात आहेत. या स्फोटामुळे या परीसरात जमीनीला भूकंपासारखे हादरे बसत आहेत. या स्फोटांची तीव्रता एवढी प्रचंड आहे, की वाळसुरे आणि वरेकोंड ( वरंडोली ) या गावातील घरांना तडे आणि भेगा गेल्या आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

वाळसुरे या गावाच्या हद्दीमधील दगड खाणीला दोन हजार ब्रास उत्खननाची परवानगी देण्यात आली आहे. मात्र स्फोटकांची तीव्रता जास्त असेल आणि त्यामुळे स्थानिकांच्या घरांचे नुकसान होत असेल तर या प्रकरणी चौकशी करुन योग्य ती कारवाई केली जाईल.
– विठ्ठल इनामदार, प्रांताधिकारी, महाड

First Published on: April 14, 2019 4:10 AM
Exit mobile version