‘जय जवान’चा महत्त्वाचा निर्णय; कोरोनाच्या संकटामुळे पहिल्यांदाच गोविंदा राहणार घरी

‘जय जवान’चा महत्त्वाचा निर्णय; कोरोनाच्या संकटामुळे पहिल्यांदाच गोविंदा राहणार घरी

ढाक्कु माकुम, ढाक्कू माकुम… बोल बजरंग बली की जय..म्हटले की सगळ्यांच्या डोळ्यांसमोर येतात ते उंचच उंच थर लावणारे गोविंदा आणि मुंबईतील दहिहंडी उत्सव. मुंबई ठाण्यामध्ये दरवर्षी मोठ मोठ्या दहिहंडीचे आयोजन केले जाते. यासाठी गोविंदा पथके दहिहंडी अगोदर काही महिने सराव देखील करत असतात. मात्र, यंदा या दहिंहंडी उत्सवाला फटका बसला आहे तो कोरोना विषाणूचा. राज्यासह देशात सध्या कोरोनाचे संकट असून, मार्च महिन्यापासून लॉकडाऊन घेऊनही मुंबई, ठाणे या सारख्या शहरांमध्ये कोरोना रुग्ण कमी होताना दिसत नाही. त्यातच दहिहंडी अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना या संकटाच्या काळात अनेक मोठ्या दहिहंड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मात्र, आता मुंबईमधील प्रसिद्ध असलेल्या जय जवान गोविंदा पथकाने देखील यंदा कोरोनाच्या संकटामुळे दहिहंडी न फोडण्याचा निर्णय घेतला असून गोविंदा घरीच राहणार आहेत. गेल्या काही वर्षामध्ये मुंबई-ठाण्यातील दहीहंडी म्हटली की, सगळ्यांचे लक्ष असते जोगेश्वरी इथल्या जय जवान गोविंदा पथकाकडे. दरवर्षी नवनवे विक्रम आपल्या नावे कोरणाऱ्या या गोविंदा पथकाने यावर्षी देखील एक नवा इतिहास रचण्याचा निर्धार केला होता. त्यासाठी तयारी देखील हे पथक करणार होते. मात्र, कोरोना संकटामुळे सरकारच्या पाठिशी उभे राहून यंदा गोविंदानी घरी राहण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, मागच्या वर्षी संकल्प प्रतिष्ठानच्या हंडीत अवघ्या काही मिनिटात नऊ थर लावत आपला जय जवानने विक्रम कायम ठेवला होता.

मुंबई – ठाण्यातील दहिहंड्या रद्द

दरम्यान, कोरोनाच्या पाश्वभूमीवर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार राम कदम यांनी आपल्या दहिहंड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दादर, माहिम, प्रभादेवी, वडाळा, धारावी येथील शिवसेना पक्षाच्या वतीने प्रतीवर्षी आयोजित करण्यात येणारे सर्व दहीहंडी उत्सव रद्द करण्यात येत असून त्यावरील खर्चाची रक्कम कोविड रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. त्यामुळे शिवाजी पार्कमधील युवा सेनेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या दहिहंडीसह दादर-प्रभादेवीतील प्रमुख आकर्षण असलेल्या शिवसेनेच्या मोठ्या दहीहंडीचे आयोजन केले जाणार नाही.

पंरपरेनुसार आम्ही विभागात फक्त पुजा आर्चा करून हा उत्सव साजरा करणार आहोत. मात्र, यावेळी कोणतेही थर लावत दहीहंडी फोडली जाणार नाही. तसेच यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे देखील पालन करणार आहोत.  – संदीप ढवळे, प्रशिक्षक, जय जवान


हेही वाचा – गावी गेलेले कामगार विमानाने मुंबईत परतले


 

First Published on: June 24, 2020 10:56 PM
Exit mobile version