लोकसभा निवडणुकीसाठी मविआच्या फॉर्म्युल्याबाबत जयंत पाटील यांनी दिली माहिती; म्हणाले…

लोकसभा निवडणुकीसाठी मविआच्या फॉर्म्युल्याबाबत जयंत पाटील यांनी दिली माहिती; म्हणाले…

मुंबई : लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या असल्यामुळे शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने एकत्र येत तयार केलेल्या महाविकास आघाडी पक्षामध्ये जागा वाटप कसं होणार, याबाबत राजकीय चर्चा होत आहे. यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले की, प्रत्येक मतदारसंघात ज्यांची जिथे जास्त ताकद आहे तिथे त्या पक्षाला प्राधान्य देणार आहे. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी काही फॉर्म्युला ठरला आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील यांनी वक्तव्य केले की, आम्ही सध्या कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही फक्त पुढील काळात काय करायचे याची चर्चा सुरू आहे. प्रत्येक मतदारसंघात ज्यांची जिथे जास्त ताकद आहे तिथे त्या पक्षाला प्राधान्य देऊ. आगामी निवडणुकीत जागा वाटपावर निर्णय घेण्यासाठी तिन्ही पक्षांचे साधारण दोन – दोन नेते समितीत काम करतील. यासोबतच इतर सर्व मित्र पक्षांनाही विश्वासात घेतले जाईल, अशी माहितीही जयंत पाटील यांनी माध्यमांना दिली.

शरद पवार यांच्या सिल्वर ओकवर रविवारी (14 मे) महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी लोकसभा निवडणुकीसंदर्भात जागा वाटपाच्या फॉर्म्युलाबाबत निर्णय झाल्याची चर्चा झाल्याची राजकीय वर्तुळात होत होती. तिन्ही पक्षांनी महाराष्ट्रात प्रत्येकी १६ जागा लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. या बैठकीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिले की, मला काहीच माहिती नाही. मी या बैठकीला आंधळा, मुका आणि बहिरा होतो, असे अजब उत्तर दिले आहे.

विधानसभा अध्यक्षांकडून अंमलबजावणी होते का हे पाहावे लागेल
१६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे सुप्रीम कोर्टाने सूचित केले आहे. हा कालावधी पाच वर्षांची टर्म संपण्यापूर्वीचा असायला हवा. त्यामुळे या कालावधीची व्याख्या विधानसभा अध्यक्ष लवकरच सांगतील अशी अपेक्षा असल्याचा टोला लगावतानाच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या वेळेत विधानसभा अध्यक्षांकडून अंमलबजावणी होते की नाही हे पाहणे गरजेचे असल्याचेही जयंत पाटील म्हणाले.

First Published on: May 16, 2023 6:11 PM
Exit mobile version