जेईईमध्ये महाराष्ट्रातील तिघांचा झेंडा

जेईईमध्ये महाराष्ट्रातील तिघांचा झेंडा

राष्ट्रीय परीक्षा संस्थेतर्फे इंजिनिअरिंग प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या जेईई मेन परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. या परीक्षेत १५ विद्यार्थ्यांना १०० पर्सेन्टाइल गुण मिळाले आहेत. या परीक्षेत देशातून ध्रुव अरोरा अव्वल आला असून, महाराष्ट्रातून राज अग्रवाल हा विद्यार्थी प्रथम आला आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील अंकित मिश्रा, कार्तिकेय गुप्ता या विद्यार्थ्यांनी १०० पर्सेन्टाइल गुण मिळवले आहेत. अंकित व कार्तिकेय यांनी या निकालानंतर आपल्या आयआयटी मुंबईमध्ये प्रवेश घ्यायचा असल्याची इच्छा व्यक्त केली.

जेईई मेन्स (जॉइंट एंट्रन्स एक्झामिनेशन) ही परीक्षा यावर्षीपासून दोनदा घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यानुसार 8 ते 12 जानेवारीदरम्यान झालेल्या या परीक्षेला देशभरातून 9 लाख 29 हजार 198 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर, त्यातील 8 लाख 74 हजार 469 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. या परीक्षेत महाराष्ट्रातील राज अग्रवाल हा 100 पर्सेन्टाइल गुण मिळवून राज्यातून अव्वल तर देशात दुसरा आला आहे. त्याचप्रमाणे अंकित मिश्रा, कार्तिकेय गुप्ता यांनीही १०० पर्सेन्टाइल गुण मिळवले. ही परीक्षा दिलेले विद्यार्थी पुन्हा एप्रिलमध्ये होणारी परीक्षा देऊ शकणार आहेत. या दोन परीक्षांतील सर्वोत्तम गुणांवर प्रवेश दिले जाणार आहेत. यामुळे या परीक्षेत कमी गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी मिळणार आहे. देशातील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी) आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी जेईई मेन्स (जॉइंट एंट्रन्स एक्झामिनेशन) ही परीक्षा आवश्यक असते.

अंकित मिश्रा, कार्तिकेय गुप्ता हे दोन्ही तरुण मुंबईतील रहिवासी आहेत. कार्तिकेयने या परीक्षेत 100 पर्सेन्टाईल गुण मिळवले असले तरी त्याने एप्रिलमध्ये होणारी अ‍ॅडव्हान्स परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्याने तयारीही सुरू केली आहे. तसेच, त्याने कोणत्या शाखेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे हे निश्चित केलेले नसले तरी पुढील शिक्षणासाठी आयआयटी मुंबईला प्राधान्य देणार असल्याचे त्याने सांगितले. तर, अंकित कुमार मिश्रा याने आयआयटी मुंबईमधून कॉम्प्युटर सायन्स करण्याचा निर्णय घेतला आहे.

परीक्षेचे वेळापत्रक
जेईई मेन्स दुसरी परीक्षा – ६ ते २० एप्रिल
जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा – १९ मे २०१९

परीक्षेचे स्वरूप
जानेवारीत पाच दिवस चाललेली ही परीक्षा जवळपास 10 टप्प्यात घेण्यात आली होती. परीक्षेसाठी 10 वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका काढण्यात आल्या होत्या. प्रत्येक प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी समान नसली तरीही प्रश्नपत्रिकेत समान धागाही नव्हता. त्यामुळे यंदा जेईई मेन्स परीक्षेच्या निकालाचे रँकिंग हे गुणांवर आधारित नसून पर्सेन्टाइलवर आधारित आहे. यात ज्या स्लॉटमधील प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांनी सोडविली असेल त्याच स्लॉटमधील पर्सेन्टाइल काढले जाणार आहे.

माझ्या यशाचे संपूर्ण श्रेय हे माझे पालक व अ‍ॅलन इन्स्टिट्यूटच्या शिक्षकांचे आहे. शिक्षकांनी दिलेल्या नोट्स व रेफरन्स बुकचा व्यवस्थित अभ्यास केला. तसेच, शिक्षक कधीही उपलब्ध असल्याने मला हे यश मिळवता आले.
– अंकित मिश्रा

मला आयआयटी मुंबईत प्रवेश घ्यायचा आहे. त्या दृष्टीकोनातून मी अभ्यास केला. सकाळी अ‍ॅलन इन्स्टिट्यूटमधील शिक्षकांनी दिलेल्या अभ्यासाची उजळणी करत असे. शिक्षकांनी दिलेल्या नोट्स व पुस्तकांचा भरपूर फायदा झाला. मी एप्रिलमधील परीक्षेला पुन्हा बसणार आहे.
– कार्तिकेय गुप्ता

First Published on: January 20, 2019 6:08 AM
Exit mobile version