चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात जुहू पोलिसांना यश

चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात जुहू पोलिसांना यश

जुहू येथे एका पॉश सोसायटीमध्ये दरोड्यासाठी आलेल्या दोघांना शुक्रवारी रात्री उशिरा जुहू पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली आहे. फयाज आलम नजीमउद्दीन चौधरी आणि संकेत ऊर्फ शुभम भाऊसाहेब म्हस्के अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोन्ही आरोपींना वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कुख्यात दरोडेखोर सनी सिंग आणि त्याचे दोन सहकारी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले असून त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी शोध मोहीम सुरु केली आहे.

दरोडेखोरांकडे मिळाले ‘हे’ भयानक साहित्य

विलेपार्ले येथील किशोरकुमार पार्कजवळील जुहू विशाल सोसायटीजवळ काही दरोडेखोर दरोड्यासाठी येणार असल्याची माहिती जुहू पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी जुहू पोलिसांच्या दोन विशेष पथकाने शुक्रवारी रात्री उशिरा तिथे गस्त सुरु केली होती. रात्री उशिरा जुहू विशाल सोसायटीजवळ एक होंडा सिटी कार थांबली. या कारमधून पाच तरुण खाली उतरले. या पाचही तरुणांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना पोलिसांनी शरण येण्याचे आवाहन केले, मात्र पोलिसांना पाहताच त्यातील तीनजण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले तर फयाज चौधरी आणि संकेत म्हस्के या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी एक महागडी होंडा सिटी कार, तीन मोबाईल, एक सुरा, मिरची पावडर, चिकटपट्टी, नायलॉनची दोरी, आदी दरोड्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहेत. यातील फयाज चौधरी आणि कमलजीत ऊर्फ सनी कुलजीत सिंग हे रेकॉर्डवरील दरोडेखोर असून त्यांच्याविरुद्ध मुंबईसह महाराष्ट्र तसेच इतर राज्यात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. कुख्यात गुंड बडाऊ जमाल ऊर्फ सुखा अकबर पाशा याचे ते दोघेही जवळचे सहकारी आहेत. त्याच्या सांगण्यावरुन त्यांनी इतर राज्यात मोठ्या प्रमाणात रॉबरी आणि दरोडे घातल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर या दोघांनाही न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून त्यांच्या इतर तीन सहकार्‍यांचा आता पोलीस शोध घेत आहेत.

First Published on: February 23, 2019 9:08 PM
Exit mobile version