Corona Fighters : धावपटूसमोर कोरोनाच्या विषाणूचा लागला नाही निभाव

Corona Fighters : धावपटूसमोर कोरोनाच्या विषाणूचा लागला नाही निभाव

मुंबईतील पहिला रुग्ण ज्या विभागात आढळून आला आणि पश्चिम उपनगरातील सुरुवातीच्या काळातसर्वांत जास्त कोरोनाबाधित रुग्ण संख्या असलेल्या जोगेश्वरी ते विलेपार्ले पश्चिम अर्थात के – पश्चिम विभागात आता हळूहळू रुग्णांची संख्या नियंत्रणात येत आहे. परंतु एक वेळ अशी होती की, या विभागाचे सहायक वैद्यकीय अधिकारी यांच्यासह सात ते आठ जण बाधित झाले होते. वैद्यकीय अधिकारी गुलनार खान यांना अधूनमधून त्रास जाणवत होता. परंतु यावर मात करत या विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे आणि वैद्यकीय अधिकारी गुलनार खान यांनी या विषाणूशी अप्रत्यक्ष प्रतिकार करत यशस्वीपणे किल्ला लढवला. आपण मॅरेथॉनमध्ये भाग घेत असून वारंवार धावण्याचा सराव करत असल्याने तसेच कदाचित माझी रोगप्रतिकारक शक्ती तेवढी चांगली असावी, त्यामुळेच या विषाणूचा हल्ल्याचा आमच्यावर परिणाम झाला नसावा, असे विश्वास मोटे सांगतात.

विलेपार्ले ते जोगेश्वरीत पश्चिम या विभागात आतापर्यंत ६ हजार ०८१ एवढे बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील ४ हजार ६४० रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर १ हजार १७२ रुग्णांवर सध्या विविध ठिकाणी उपचार सुरु आहेत. तर एकूण २६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. के – पश्चिम विभागातच पहिला रुग्ण ११ मार्च रोजी आढळून आला होता. भवन्स कॉलेजजवळच्या परिसरातील हा रुग्ण होता. तिथून कोरोनाच्या उपाय योजनांच्या कामाला सुरुवात झाली ते आजतागायत. मात्र, सुरुवातीच्या काळात पश्चिम उपनगरांतील के – पश्चिम विभागांतच सर्वांधिक रुग्ण आढळून येत होते. त्यावेळी सर्व प्रकारच्या यंत्रणा अपुऱ्या पडत असतानाच मनुष्यबळही कमी पडत होते. एप्रिल आणि मे महिन्यात तर केवळ ३० टक्केच कामगार, कर्मचारी होते. बरेचसे कर्मचारी कामावर येत नव्हते. त्यामुळे एक प्रकारची कसोटीच होती. मात्र, ही यंत्रणा राबवताना त्यांच्याही भोवती कोरोनाचा विषाणू पिंगा घालून गेला होता. हा अनुभव सांगताना मोटे म्हणाले, मे महिन्यात नाही म्हटले तरी सहायक वैद्यकीय अधिकारी यांच्यासह घनकचरा विभागाचे कर्मचारी व इतर अशाप्रकारे सात ते आठ जण पॉझिटिव्ह निघाले होते. त्यावेळी मला आणि एमओएचे गुलनार खान यांनाही अधूनमधून त्रास जाणवत होता. पण आम्ही दोघांनीही ठरवले की टेस्ट करायची नाही म्हणून. कारण आपण जर टेस्ट केली तर ९९.९९ टक्के ती पॉझिटिव्ह येईल. आणि इथल्या इथली टिमचे मनोधर्य खचले जाईल. त्यावेळी सर्वच असुरक्षित भावनेने वागत होते. त्यातच जर कॅप्टनच बाधित झाले आणि क्वारंटाईन झाले तर सर्वच यंत्रणा विस्कळीत होईल याचीही आम्हाला भीती वाटत होती. म्हणून मग उपाययोजना म्हणून स्टिम घेणे व इतर बेसिक उपाययोजनांचा अंमलबजावणी करण्यासह सकाळच्या नाश्तामध्ये फळांचा आहार देण्याचाही प्रयोग करून बघितला. कारण मे महिना हा आमच्यासाठी सर्वांप्रमाणेच कठिण होता. त्याचदरम्यान मला त्रास जाणवत होता. पण सुदैवाने मी मॅरेथॉन या धावण्याच्या स्पर्धेत भाग घेत असल्याने, दररोज धावण्याचा सराव करत असल्याने माझी रोगप्रतिकार शक्ती कदाचित अधिक असेल, त्यामुळे मी, पटकन रिकवर झालो. पण मी कधीच टेस्ट करून नाही घेतली. आजतागायत अशी टेस्ट केलेली नाही, असे ते सांगतात.

कोरोनाची बातमी जशी कळाली तसे मी माझ्या आईला गावी पाठवून दिले. कारण तिला मधुमेहाचा आजार आहे. यामुळे मी एप्रिल महिन्यातच तिला गावी पाठवले. आता अकरा वर्षाचा मुलगा, बायको आणि मी इथे राहतात. तसे पाहिले तर मी सुरुवातीचे दहा ते पंधरा दिवस बाहेरच राहत होतो. त्यानंतर योग्यप्रकारे काळजी घेत माझ्या घरी स्वतंत्र खोलीत राहू लागलो. अगदी एखाद्या पाहुण्यासारखाच. आणि घरचेही मला काही हवं नको ते माझ्या खोलीबाहेर आणून ठेवायचे. त्यामुळे घरात राहत असलो तरी त्यांच्यात कधी मिसळत नव्हतो. पण जुनपासून मग थोडीथोडी भीती कमी होवू लागली तसे मी त्यांच्यामध्ये वावरू लागलो. एकत्र जेवण, नाश्ता करू लागलो. सुरुवातील घरचे घाबरत असले तरी पुढे त्यांनीच मला प्रोत्साहन देण्याचे काम केले होते.

गिल्बर्ट हिल व नेहरू नगर या भागातच सर्वात जास्त रूग्ण होते तेव्हा. पण आता या सर्व झोपडपट्टी तसेच मोठ्या वस्त्यांमध्ये हे प्रमाण खूपच कमी आहे. विशेष म्हणाजे वरळीपेक्षा दीडपटीने लोकसंख्या असलेल्या वर्सोवातील आजारही पूर्ण नियंत्रणात आला. या भागातील लोकप्रतिनिधी, स्थानिक संस्थांचे प्रतिनिधी, पदाधिकारी व एनजीओ आदींच्या मदतीमुळेच कोळीवाडा कोरोनामुक्त होवू शकला. परंतू संपूर्ण या विभागातील कोरोना नियंत्रणात आणण्यात संपूर्ण वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक, महापालिकेच्या विभाग कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य तर आहेतच शिवाय स्थानिक आमदार अमित साटम, नगरसेवक यांचेही योगदान मोठे आहे. त्यांची वारंवार मदत मिळत गेली. याशिवाय माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसेही वारंवार फोन करून आम्हाला मार्गदर्शन करत असत, असे ते सांगतात.

हेही वाचा –

दिलासा! भारतात विकसित केलेल्या कोरोना लसीची AIIMS मध्ये मानवी चाचणी सुरू

First Published on: July 24, 2020 7:12 PM
Exit mobile version