कळवा हॉस्पिटलचा अनागोंदी कारभार सुरूच!

कळवा हॉस्पिटलचा अनागोंदी कारभार सुरूच!

कळवा हॉस्पिटल

ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची प्रकृती खालावली आहे, असे सांगत रुग्णांच्या नातेवाईकांना संबंधित रुग्णाला मुंब्र्याच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. नातेवाईकांनी या खाजगी हॉस्पिटलमध्ये धाव घेतल्यानंतर या नावाचा कोणताच रुग्ण दाखल नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर पुन्हा नातेवाईकांना कळवा हॉस्पिटल गाठावे लागले. यावेळी पुन्हा कळवा रुग्णालयाने नवीन दूरध्वनी नंबर दिल्यानंतर तो सिव्हिल रुग्णालयाचा नंबर निघाला. मात्र सिव्हिल पोचल्यावर नेटवाईकांना रुग्ण नव्हे तर त्याचे शव ताब्यात घ्यावे लागले. या दोन दिवसांत रुग्णांचा मृत्यू झाला होता.

पालिकेच्या कळवा रुग्णालयाच्या अनागोंदी कारभाराची मालिका सुरूच आहे. आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मृत रुग्णांचे नातेवाईक आणि कोकण पदवीधर मतदार संघाचे भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.रुग्णांचा चुकीचा अहवाल देण्यामुळे कळवा रुग्णालय चर्चेत असतांना त्याचा आणखी एक अनागोंदी कारभार समोर आला आहे.

असा घडला प्रकार

एका ५० वर्षीय व्यक्तीला १३ जून रोजी या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यानंतर १७ जून रोजी त्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. दरम्यान रुग्णासाठी लागणारे औषधे देखील रुग्णालयाला आणून दिली होती. परंतु बुधवारी त्याच्या नातेवाईकांना रुग्णालय व्यवस्थापनाने फोन करुन रुग्णाची प्रकृती खालावल्याने त्याला मुंब्य्रातील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आल्याचे सांगितले.

तसेच त्या रुग्णालयाचा दूरध्वनी क्रमांकही देण्यात आला. परंतु नातेवाईकांनी तो या खाजगी रुग्णालयात दाखल आहे किंवा नाही, याची माहिती घेण्यासाठी थेट रुग्णालय गाठले. तर त्याठिकाणी त्यांनी जे नाव सांगितले त्या नावाचा कोणताही रुग्ण दाखलच नसल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाने सांगितले. त्यानंतर गुरुवारी पुन्हा हे नातेवाईक कळवा रुग्णालयात आले असता, त्यांना पुन्हा तेच उत्तर देण्यात आले. परंतु यावेळेस त्यांनी दुरध्वनी क्रमांक देतांना दुसरा नंबर दिला. त्या क्रमांकावर फोन केला असता, तो ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाचा असल्याचे त्यांना समजले. परंतु ते रुग्णाची विचारपुस करण्यासाठी रुग्णालयात जाण्यापूर्वीच त्या रुग्णाचा मृत्यू झाला होता.

या अनागोंदी कारभाराच्या चौकशीची मागणी

त्यामुळे आता कळवा रुग्णालयाच्या या अनागोंदी कारभाराची चौकशी करुन संबधींतावर कारवाई करण्याची मागणी रुग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे. तर कळवा रुग्णालयाकडून वारंवार असे प्रकार घडत असून महापालिका प्रशासन आता तरी जागे होणार का? असा सवाल निरंजन डावखरे यांनी उपस्थित केला आहे, तर या प्रकरणाची चौकशी करुन संबधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.


मुंबईच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टर्सचा टास्क फोर्स नेमण्याचे मुख्यमंत्र्याचे निर्देश
First Published on: June 19, 2020 11:44 PM
Exit mobile version