मुंबईत नोकरी ‘नको रे बाबा’, रेल्वेतील गर्दीमुळे महिलांमध्ये धास्ती

मुंबईत नोकरी ‘नको रे बाबा’, रेल्वेतील गर्दीमुळे महिलांमध्ये धास्ती

मुंबई रेल्वेमधील गर्दीचे प्रातिनिधिक छायाचित्र

अपुऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या आणि रेल्वे गाड्यावर प्रवाशांचा वाढलेला ताण यामुळे रेल्वेच्या गर्दीचे बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नोकरी निमित्त मुंबईला रेल्वे गाडीने जाणाऱ्या प्रवाशांना गर्दीचा बळी ठरावे लागत आहे. वाढत्या गर्दीच्या भितीपोटी नोकरदार महिलांमध्ये धास्तीचे वातावरण वाढलं आहे. कल्याणातील एका महिलेने नोकरीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. तर कल्याण डोंबिवली काही महिला नोकरीं सोडण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे मुंबईला नोकरी नको रे बाबा… अशी म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.

घडयाळयाच्या काटयावर डोंबिवलीकरांचा दिनक्रम सुरू होतो. ९० टक्के कल्याण-डोंबिवलीकर हे नोकरी आणि व्यवसायानिमित्त मुंबईला जातात. रेल्वे वाहिनी ही चाकरमाण्यांची जीवनवाहिनी म्हणूनच ओळखली जाते. डोंबिवली स्थानकातून प्रवास करताना प्रवाशांना नाकीनऊ येतात. या स्थानकातून दररोज २ लाख ६४ हजार प्रवासी प्रवास करतात. तर ठाणे स्थानकातून दरदिवशी पावणे तीन लाख प्रवासी प्रवास करतात. दिवा स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सव्वा लाखापर्यंत पोहचली आहे. घरातील कर्त्या पुरुषाला आर्थिक हातभार लावण्यासाठी महिलाही मोठय़ा संख्येने नोकरी करतात.

हे वाचा – डोंबिवलीत लोकलमधून पडून आतापर्यंत ९४ जणांचा मृत्यू!

नोकरदार महिलांना घरची कामे संभाळून नोकरीच्या वेळा पाळाव्या लागतात. गर्दीच्या वेळात सकाळी जलद गाड्या असतात. वेळेत पोहचण्यासाठी या गाड्यांना सकाळी चाकरमान्यांची एकच गर्दी असते. ऑफीसला उशिरा पोहचल्यानंतर लेट मार्क होतो. एका दिवसाचा लेटमार्क समजू शकतो. दररोज लेटमार्क होत असेल तर कार्यालयातून संबंधित महिला कर्मचाऱ्यांना समजून घेतले जात नाही. प्रवासी गर्दीचे आत्तार्पयत सात बळी ठरले आहे. त्यात महिला प्रवाशांचाही समावेश आहे. मागील आठवडयात चार्मी पासद या २२ वर्षीय तरुणीचा धावत्या लोकलमधून पडून मृत्यू झाला. चार्मि ही वाढत्या गर्दीची बळी ठरली. वाढत्या गर्दीमुळे नोकरदार महिलांमध्ये भितीचे वातावरण आहे. कल्याणातील संध्या तावडे या महिलेने नोकरीला रामराम ठोकला आहे. काही महिलानी नोकरी सोडण्याच्या विचारात आहेत.

लोकलसेवा हा झटपट प्रवासाचे साधन असल्याने रस्ते प्रवासापेक्षा जास्तीत जास्त प्रवासी लोकलनेच प्रवास करतात त्यामुळे गेल्या काही वर्षात् प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढत होत आहे त्यातच बाहेरून येणारे लोंढे आणि परवडणारी घरे यामुळे उपनगराकडे राहण्याचा ओढा वाढत आहे त्यामुळे उपनगराकडून शहराकडे लोकलने प्रवास करण्याचे प्रमाण वाढले आहे यातील बहुतांशी प्रवासी ठाण्यापुढील दिवा मुंब्रा कळवा कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर या स्थानकांवरल प्रवाशांचा ताण वाढत आहे. प्रवासी संख्या वाढली त्या तुलनेत रेल्वे गाडयांची संख्या वाढलेली नाही त्यामुळेच प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

गेल्या पाच ते सहा वर्षापासून लोकलमधील गर्दी खूपच वाढली आहे. वाढत्या गर्दीमुळे प्रवास करणे असहय होत आहे. त्यामुळे सहा महिन्यापूर्वीच नोकरीचा राजीनामा देऊन स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. लोकलमधील प्रवास आता नकोसा झाला आहे. वाढत्या गर्दीमुळे लोकलमधून पडून अनेकांना जीव गमवावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाकडून कोणत्याच उपाय योजना केल्या जात नाहीत. त्यामुळे अनेक महिला मुंबईला नोकरीला जाण्यासाठी कंटाळल्या आहेत. – संध्या तावडे, महिला प्रवासी

आता लोकलमधील गर्दी खूपच वाढली आहे त्यामुळे चाळीशी नंतर महिलांना गर्दीमध्ये चढणे, उभं राहणं आणि उतरणे शक्य होत नाही. काही महिलांचे पती मृत्यूमुख पडले आहेत तर काही महिलांना काळाची गरज म्हणून नोकरी करावी लागत आहे. मात्र अनेक महिलांना चांगली नोकरी सोडावी लागत आहे हे वस्तुस्थिती आहे. वाढत्या गर्दीमुळे व पडून जीव गमावण्यापेक्षा अनेकांना नोकरी सोडण्याशिवाय पर्याय नाही. – लता आरगडे, रेल्वे प्रवासी संघटनाए पदाधिकारी

First Published on: December 21, 2019 8:27 PM
Exit mobile version