प्रवासासाठी बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या ट्रॅव्हल्स एजन्सीचा पर्दाफाश, काशीमिरा पोलिसांची कारवाई

प्रवासासाठी बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या ट्रॅव्हल्स एजन्सीचा पर्दाफाश, काशीमिरा पोलिसांची कारवाई

सोमवारी काशिमीरा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखा युनिट १ या पथकाला काही लोकं गुजरातला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. दरम्यान, गुजरात राज्यात प्रवेश करण्यासाठी कोरोना टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह असेल तरच प्रवेश देण्यात येत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सुरू असताना मुंबईत एक ट्रॅव्हल एजन्सी मालक प्रवाशांकडून जास्त शुल्क आकारत त्यांची कोणतीही कोरोना चाचणी न करता बनावट निगेटिव्ह कोरोना रिपोर्ट तयार करत असल्याचे समोर आले आहे. प्रवासासाठी बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या ट्रॅव्हल्स एजन्सीचा काशीमिरा पोलिसांनी पर्दाफाश केला, आणि त्यांच्यावर कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एकूण ३२ प्रवाशी हे गुजरातच्या दिशेने प्रवास करत होते आणि त्या प्रवाशांकडे बनावट RT-PCR कोरोनाचा रिपोर्ट आढळून आले. तर उरलेल्या १२ प्रवाशांकडून देखील या ट्रॅव्हल एजन्सी मालकाने RT-PCR रिपोर्टच्या नावाखाली जास्तीचे शुल्क आकारल्याचे सांगितले जात आहे. या एकूण ३२ प्रवाशांसह २ ड्रायव्हर आणि १ क्लीनर नियमांचे उल्लंघन करताना आढळले. या प्रकऱणी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गंत काश्मिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने हा संसर्ग वाढू नये, म्हणून एका राज्यातून दूसऱ्या राज्यात प्रवेश करण्यास कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट असणं काही राज्यांनी अनिवार्य केले आहे. मात्र काही बेजबाबदार नागरिकांमुळे कोरोनाचा फैलाव वाढण्याची भिती देखील तितकीच आहे. दरम्यान, सोमवारी राज्यात ६० हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. मात्र त्यासोबतच राज्यात आज १० हजारांहून अधिक रुग्णसंख्येत घट झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ५१ हजार ७५१ नवीन रुग्ण आढळले असून २५८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३४ लाख ५८ हजार ९९६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५८ हजार २४५ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ५२ हजार ३१२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत राज्यात आजपर्यंत एकूण २८ लाख ३४ हजार ४७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

First Published on: April 13, 2021 2:02 PM
Exit mobile version