KEM Chaos : गुन्हेगाराला अटक न केल्यास संप पुकारणार; डॉक्टरांचा इशारा

KEM Chaos : गुन्हेगाराला अटक न केल्यास संप पुकारणार; डॉक्टरांचा इशारा

‘अटक करा… अटक करा… गुन्हेगाराला अटक करा, जस्टीस फॉर डॉक्टर’ अशी घोषणाबाजी करत मार्डच्या डॉक्टरांकडून केईएम हॉस्पिटलमध्ये जोरदार आंदोलन केले. यावेळी गुन्हेगाराला अटक न केल्यास संपावर जाण्याचा इशाराही डॉक्टरांकडून देण्यात आला. जिवंत रुग्णाला मृत घोषित केल्याचा आरोप करत रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टर महिलेला केलेली शिवीगाळ आणि या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या निषेधार्थ शनिवारी केईएममधील मार्डच्या डॉक्टरांनी जोरदार आंदोलन केले.

९ सप्टेंबरला केईएम हॉस्पिटलमध्ये जतिन परमारच्या निधनानंतर त्याच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला. तसेच जिवंत व्यक्तीला मृत घोषित केल्याचा आरोप करून डॉक्टर महिलेला शिवीगाळ केली. या सर्व प्रकरणाचा व्हिडिओ शनिवारी सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. त्यामुळे हॉस्पिटल व डॉक्टरांची प्रतिम मलीन करण्याचा प्रयत्न रुग्णाच्या नातेवाईकांकडून करण्यात आला. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांविरोधात कारवाई करण्याची मागणी केईएम मार्डकडून करण्यात आली. त्यासाठी मार्डच्या डॉक्टरांनी दुपारी ३.३० वाजता केईएम हॉस्पिटलमध्ये जोरदार आंदोलन केले. यावेळी अटक करा… अटक करा… गुन्हेगाराला अटक करा…, जस्टीस फॉर डॉक्टर अशा जोरदार घोषणा डॉक्टरांनी दिल्या.

सोशल डिस्टन्सिंग पाळत डॉक्टरांनी हे आंदोलन केले. रुग्णांच्या नातेवाईकांनी व्हायरल केलेला व्हिडिओ म्हणजे कोरोनामध्ये अविरत अखंड निस्वार्थपणे काम करणार्‍या डॉक्टरांचा अपमान करणार आहे. या व्हिडिओतून नागरिकांमध्ये गैरसमज व संभ्रम पसरवण्यात आला आहे. त्यामुळे दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यासंबंधी भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.


वाचा सविस्तर –
KEM मध्ये मृत रुग्णाच्या नातेवाईकांची महिला डॉक्टरला अर्वाच्च्य शिवीगाळ; इथे पाहा Video!

मुख्यमंत्री, गृहमंत्री, वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्री यांनी या प्रकरणांमध्ये तात्काळ लक्ष घालून या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी. तसे न झाल्यास निवासी डॉक्टरांच्या स्वाभिमान, सुरक्षा हित आणि अशा समाजकंटक प्रवृत्तीमुळे समाजामध्ये गैरसमज निर्माण होऊन डॉक्टरांवर हल्ले वाढण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता आमच्याकडे काम बंद आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. सध्याच्या काळात संप पुकारणे योग्य नसले तरी सरकारने गुन्हेगारांना अटक न केल्यास आम्ही या पर्यायाचा अवलंब करू इशारा दिला. या दरम्यान रुग्णांचे हाल झाल्यास त्याला डॉक्टर जबाबदार राहणार नाहीत, असेही केईएम मार्डचे अध्यक्ष डॉ. दीपक मुंढे यांच्याकडून सांगण्यात आले.

First Published on: September 12, 2020 8:02 PM
Exit mobile version