केनेडी फेंसिंग जाळ्या ठरल्या निष्प्रभ

केनेडी फेंसिंग जाळ्या ठरल्या निष्प्रभ

केनेडी फेसिंग जाळ्या

घाटमार्गावरील रेल्वे मार्ग दरडीपासून सुरक्षित रहावे, याकरता मध्य रेल्वेने मुंबई-पुणे मार्गावरील लोणावळा ते कर्जत दरम्यान पावसाळ्यापूर्वी विदेश तंत्रज्ञानाप्रमाणे केनेडी फेसिंग जाळी बसवली, त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला, मात्र जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या पावसामुळे या जाळ्या निष्काम ठरल्या आणि दरड कोसळून मार्ग बंद पडला. त्यामुळे रेल्वेचे या केेनेडी फेंसिंग जाळ्यांमध्ये कोट्यवधीचा पैसा वाहून गेल्याचे आता उघडकीस आले आहे.

मध्य रेल्वेच्या पुणे-मुंबई मार्गावर लोणावळा ते कर्जत या घाटमार्गावर पावसाळ्यामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात लोणावळा ते कर्जत या मध्य रेल्वेच्या हद्दीत अनेकदा दरड कोसळण्याच्या घटना घडतात. यात रुळावर आलेल्या मोठमोठ्या दगडांमुळे मेल-एक्स्प्रेस गाड्यांची सेवा बंद होते. त्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने या घाट मार्गाच्या दुरुस्तीच्या कामासाठी करोड रुपये खर्च करून मान्सूनपूर्व कामे केली जातात. यावर्षी सुद्धा मध्य रेल्वेने घाटमार्गावर मोठ्या प्रमाणात तयारी केली होती, ज्यात दरड कोसळून नये यासाठी मध्य रेल्वेने पावसाळ्यापूर्वी 700 बोल्डर काढण्यात आले होते. त्याच बरोबर आधुनिक पद्धतीने परदेशाप्रमाणे केनेडी फेसिंग जाळी बसवली होती.

मात्र मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मध्य रेल्वेचा बोजवरा उडवला. लोणावळा ते कर्जत या घाटमार्गावर दुरुस्तीसाठी 26 जुलैपासून मुंबई- पुणे धावणार्‍या काही गाड्या 15 दिवसांसाठी बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णपणे मोठ्या प्रमाणात या घाटमार्गावर दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. इतकेच नव्हे तर रेल्वेने लावलेली केनेडी फेंसिंगचा सुद्धा चुराडा झाला आहे. त्यामुळे गेल्या आठवड्याभरापासून मुंबई-पुणे मार्ग रेल्वेला बंद करावा लागला आहे. प्रवाशांबरोबर रेल्वेला सुध्दा फटका बसला आहे.

गेल्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे सर्वाधिक लोणावळा ते कर्जत या दरम्यान दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे काही दिवसांपासून मुंबई – पुणे रेल्वे मार्ग बंद आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यातील पावसामुळे ३ आणि ४ ऑगस्ट या दोन दिवसांमध्ये 368 मेल एक्स्प्रेस, 44 पेसेंजर आणि 1646 लोकल गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. यामध्ये 35. 61 कोटी रुपये मध्य रेल्वेला नुकसान झाले होते. त्याच बरोबर मुंबई- पुणे मार्गावरील मालगाडी बंद पडल्यामुळे रेल्वेला दररोज 5 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.यामध्ये 1 ऑगस्ट ते आतापर्यंत 40 कोटी रुपये नुकसान झाले आहे. अशा प्रकारे मध्य रेल्वेला एकूण 75 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

मान्सून दरम्यान आम्ही दोन्ही घाटमार्गावर लक्ष देऊन असतो. मात्र यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे रेल्वेचे बरेच नुकसान झाले. त्यामुळे आम्ही सुरक्षेसाठी लोणावळा ते कर्जत हा रेल्वे मार्ग बंद केला. आता हा मार्ग सुरू करण्याचे युद्धपातळीवर काम सुरू आहे.
– ए.के. जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

First Published on: August 9, 2019 6:27 AM
Exit mobile version