अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बारा तास अत्याचार

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बारा तास अत्याचार

एका अल्पवयीन मुलीचे चाकूचा धाक दाखवून अपहरण केल्यानंतर तिच्यावर तब्बल बारा तास चौघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नालासोपार्‍यात घडल्याचे उजेडात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली असून त्यात एक आरोपी अल्पवयीन आहे. तर चौथा आरोपी फरार झाला आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेनंतर नालासोपारा शहरात महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नालासोपारा पूर्वेकडील गालानगर येथे राहणारी सतरा वर्षीय मुलगी शनिवारी पहाटे साडेपाच वाजता आपल्या दोन मित्रांसह नागेला तलावावर मॉर्निंग वॉकसाठी गेली होती. त्यावेळी अमित बाटला आपल्या तीन साथीदारांसह त्याठिकाणी आला. यावेळी त्याने पिडीत मुलीला आपल्यासोबत येण्याचा आग्रह धरला. तिने नकार दिला असता, माझ्यासोबत आली नाहीस तर उचलून नेईन, अशी धमकीही दिली. तिच्या मित्रांनीही याला विरोध केला. त्यावेळी अमित आणि त्याच्या साथीदारांनी चाकूचा धाक दाखवत मुलीला रिक्षात कोंबले आणि मित्रांना मारण्याची धमकी देऊन पसार झाले.

चार जणांनी पिडीत मुलीला वैतीवाडी परिसरातील मोहम्मदी बिल्डींगच्या चौथ्या मजल्यावर नेऊन डांबून ठेवले. त्यानंतर तब्बल बारा तास चौघांनी आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केला. संध्याकाळी पाचच्या सुमारास संधी साधून पिडीत मुलीने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर तुळींज पोलीस ठाण्यात जाऊन तिने तक्रार नोंदवली. याप्रकरणी अमित बाटला, रोहित उर्फ मेंटल, कैलाश आणि आणखी एका अल्पवयीन आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. रोहित, कैलाश आणि एका अल्पवयीन आरोपीला रात्री अटक करण्यात आली आहे. तर मुख्य आरोपी अमित बाटला घटनास्थळावरून फरार झाला आहे.

First Published on: November 19, 2019 2:01 AM
Exit mobile version