वाधवान प्रकरणी शरद पवार यांचा हात; किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप

वाधवान प्रकरणी शरद पवार यांचा हात; किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप

शरद पवार आणि किरीट सोमय्या

राज्यात सध्या कोरोनाचे संकट असताना, राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे, ते वाधवान बंधूंच्या महाबळेश्वर येथील प्रवासामुळे. या प्रकरणावरून राज्य सरकारवर टीका होत असतानाच आता या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. शरद पवार यांच्या पाठिंब्याशिवाय हे पत्र मिळणे शक्य नसल्याचे सांगत सोमय्या यांनी शरद पवार आणि वाधवान कुटुंबियांचे घरगुती संबंध असल्याचे जगजाहीर असल्याचा थेट आरोपच पवारांवर केला आहे. एवढेचं नाही तर वाधवान यांच्यामागे पॉवरफुल असे पवार कुटुंब असल्याचेदेखील सोमय्या यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – LockDown: वाधवान कुटुंबासह २३ जणांवर गुन्हा दाखल; १४ दिवस राहणार क्वारंटाइन

गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा

दरम्यान, याप्रकरणी अधिकाऱ्यांवर जरी कारवाई केली, असे सांगितले जात असले तरी यात गृहमंत्री अनिल देशमुख हे देखील तितकेच दोषी असल्याचे म्हणत गृहमंत्री अनिल देशमुख यांची गृहमंत्री पदावरून हकालपट्टी करा, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विशेष गृह सचिव अमिताभ गुप्ता यांना वाधवान प्रकरणी चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. अनिल देशमुख यांनी रात्री दोन वाजता या संदर्भात ट्विटरवरून माहिती दिली.

काय आहे प्रकरण

देशासह राज्यात लॉकडाऊन असताना वाधवान कुटुंबियांसह तब्बल २३ जणांनी ५ गाड्यांमधून खंडाळा ते महाबळेश्वर प्रवास केल्याची खळबळजनक माहिती समोर आली. हा प्रवास त्यांनी गृहमंत्रालयातील विशेष गृह सचिव अमिताभ गुप्ता यांच्या पत्रावर केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संचारबंदीच्या काळात वाधवान कुटुंबिय प्रवास कसे करू शकतात, या मुद्द्यावर विरोधकांनी गृहखात्याला चांगलेच धारेवर धरले. महाबळेश्वरमधील स्थानिकांनी केलेल्या तक्रारीमुळे हा प्रकार उघड झाला असून त्यामध्ये या सर्व २३ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील वाधवान बंधू डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी काही दिवसांपूर्वीच जामिनावर सुटले आहेत.

हेही वाचा –

LockDown: वाधवानप्रकरणी अमिताभ गुप्ता सक्तीच्या रजेवर; गृहमंत्र्यांचे आदेश

First Published on: April 10, 2020 12:42 PM
Exit mobile version