Kirit Somaiya: किरीट सोमय्या हल्ला प्रकरणी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वरांना अटक

Kirit Somaiya: किरीट सोमय्या हल्ला प्रकरणी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वरांना अटक

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर खार पोलीस स्टेशन येथे शनिवारी हल्ला झाला होता. या प्रकरणात मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ला प्रकरणात खार पोलिसांनी अटक केली आहे. याआधी महाडेश्वर यांची कसून चौकशी खार पोलिसांकडून करण्यात आली होती. त्यानंतर महाडेश्वर यांना ताब्यात खेत पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात खार पोलिसांनी महाडेश्वर यांना जामीनही मंजूर केला आहे. महाडेश्वर यांच्यासोबतच शिवसेनेच्या तीन माजी नगरसेवकांनाही अटक करण्यात आली होती. त्यांनाही पोलिसांनी जामीन मंजूर केला आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक दिनेश कुबल, शेखर वायंगणकर, हाजी आलम यांनाही अटक करण्यात आली होती.

विश्वनाथ महाडेश्वर हे सोमय्यांवर जेव्हा हल्ला झाला त्यावेळी घटनास्थळी हजर होते. सोमय्या यांच्या कार चालकाने शिवसैनिकांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच सोमय्या यांच्या ड्रायव्हर विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. रॅश आणि बेजबाबदारपणे गाडी चालवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

किरीट सोमय्या हे नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या भेटीसाठी खार पोलीस ठाणे येथे आले होते. त्याआधी किरीट सोमय्या यांनी ट्विट करत आपण खार पोलीस ठाणे येथे येणार असल्याची माहितीही दिली होती. किरीट सोमय्या हे खार पोलिस स्थानकातून बाहेर पडताच त्यांच्यावर शिवसैनिकांनी बॉट्ल्स, चप्पल आणि दगडफेक यासह हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केला होता. या प्रकरणात वांद्रे येथील पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली होती. पण ही तक्रार खार पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली. जवळपास ६० ते ७० जणांनी हल्ला केल्याचे किरीट सोमय्यांनी म्हटले होते. खार पोलीस स्टेशनसमोरच झालेल्या घटनेत किरीट सोमय्या हे किरकोळ जखमीही झाले होते.

किरीट सोमय्या हे खार पोलीस ठाण्यात झालेल्या हल्ल्याच्या मुद्द्यावर आज केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांना शिष्टमंडळासह दिल्लीत भेटले आहेत. या भेटीत त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती दिली. तसेच केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचीही त्यांनी आज भेट घेतली. राज्याचे विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही केंद्रीय गृह सचिवांना पत्र लिहिले आहे. किरीट सोमय्या यांच्यावर पोलिसांच्या उपस्थितीत, पोलिस ठाण्यासमोर हल्ला होतो, हे गंभीर आहे. मी स्वतः केंद्रीय गृहसचिवांना पत्र दिले आहे. ते योग्य दखल घेतील, हा मला विश्वास आहे, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी मांडले आहे.


 

First Published on: April 25, 2022 5:41 PM
Exit mobile version