महापौरांच्या ओएसडीपदी डॉ. किशोर क्षिरसागर!

महापौरांच्या ओएसडीपदी डॉ. किशोर क्षिरसागर!

मुंबईच्या महापौरपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी महापौरपदाचा कारभार हाकायला सुरुवात केली. परंतु, किशोरी पेडणेकर यांच्या कामातीचा वेग पाहता पक्ष प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यांच्या कार्यपध्दतीत सुधारणा करण्यासाठी चक्क निवृत्त सहआयुक्तांची नेमणूक त्यांच्या दालनात केली आहे. निवृत्त सहआयुक्त डॉ. किशोर क्षिरसागर यांची नेमणूक मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार महापौर दालनात विशेष कार्य अधिकारी (ओएसडी)करण्यात आली आहे. दोन सख्खे मित्र आता मुख्यमंत्री आणि महापौरांकडे ओएसडी म्हणून महत्वाच्या जबाबदारी पार पाडताना दिसणार आहेत.

तीनच दिवसांपूर्वी स्वीकारला पदभार

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापौर पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर आपल्या खासगी स्वीय सहाय्यकाची नेमणूक केली. परंतु, आता महापौर दालनात नव्या ओएसडींची नेमणूक करण्यात आली आहे. या ओएसडी पदाचा भार महापालिकेत ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त झालेले सह आयुक्त डॉ. किशोर क्षिरसागर यांनी तीन दिवसांपूर्वी स्वीकारला. त्यामुळे महापौरांच्या कारभाराची धुरा आता क्षिरसागर यांच्या हाती असून क्षिरसागर यांच्यामुळे महापौरांनाही आता योग्यप्रकारे महापौरपदाचा कारभार हाकता येणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्याच सूचनेनुसार नेमणूक!

मुंबईत क्षिरसागर यांच्यासोबतच सेवानिवृत्त झालेले सुधीर नाईक यांची नेमणूक मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीपदी झालेली आहे. सुधीर नाईक मुख्यमंत्र्यांचे ओएसडी झाल्यानंतर त्यांनी आपल्या मित्रालाही महापौरांचे ओएसडी म्हणून वर्णी लावली असल्याची चर्चा आहे. खुद्द महापौरांना क्षिरसागर यांची नेमणूक मान्य नसली तरी खुद्द मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख असलेल्या उध्दव ठाकरे तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसारच ती झाल्याने किशोरी पेडणेकर यांना मात्र, त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागत आहे. ओएसडी असलेल्या किशोर क्षिरसागर यांच्यासाठी नवीन आणि जुन्या इमारतीला जोडणार्‍या पुलावरील पहिल्या मजल्यावर असलेल्या आरोग्य समिती अध्यक्षांच्या जुन्या दालनामध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे महापौरांच्या माध्यमातून शिवसेनेच्या वचननाम्यातील महत्वाच्या योजना आणि घोषणांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोनातून ते प्रयत्न करणार आहेत. तसेच राज्य शासनाशी संबंधित कामांसंदर्भात समन्वय राखून पाठपुरावाही करणार असल्याचेही समजते.

अनेक वर्षांपासून पद रिक्तच!

किशोरी पेडणेकर यांच्या कार्यपध्दतीवर लक्ष ठेवण्यासाठीच या ओएसडींची नेमणूक केल्याचेही बोलले जात आहे. महापालिकेत महापौरांच्या दालनात सहायक आयुक्तांचे एक पद असून माजी महापौर श्रध्दा जाधव यांच्या कारकिर्दीमध्ये विजयानंद बोले यांची नियुक्ती केली होती. परंतु, त्यानंतर आलेल्या महापौरांनी या पदावर कुठल्याही सहायक आयुक्तांची वर्णी लावलेली नाही. परिणामी हे पद रिक्त आहे. त्यामुळे निवृत्त सहआयुक्तांची नेमणूक महापौरांच्या दालना ओएसडी म्हणून केल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे महापालिकेतील ही सहआयुक्तपदी निवृत्त झालेली जोडगोळी आता राज्यात मुख्यमंत्री आणि महापालिकेत महापौरांकडे महत्वाची जबाबदारी पार पाडणार आहेत.

First Published on: January 18, 2020 7:30 AM
Exit mobile version