मुंबई अध्यक्षपदावरून निरुपमांची होणार उचलबांगडी?

मुंबई अध्यक्षपदावरून निरुपमांची होणार उचलबांगडी?

संजय निरुपम

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना पदावरून हटवण्याच्या हालचालींना वेग आला असून त्यांच्या जागी माजी आमदार कृपाशंकर सिंह यांची निवड होण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. आठवडाभरात कृपाशंकर यांच्या नावाची घोषणा होईल. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी म्हणून मल्लिकार्जुन खर्गे यांची निवड झाल्यानंतर निरुपम यांना दूर करू इच्छिणारा गट सक्रिय झाला आहे. मुंबईतील काँग्रेसचे भवितव्य टिकवून ठेवायचे असेल तर तातडीने निरूपम यांना पदावरून हटविणे हाच एकमेव उपाय असल्याचे खर्गे यांना पटवून देण्यात हा गट यशस्वी झाला आहे. महाराष्ट्राचे माजी प्रभारी मोहन प्रकाश आणि निरुपम यांचे चांगले संबंध आहेत. दोघेही बिहारचे असल्याने एकमेकांच्या अडचणी समजून घेत असत. मुख्य म्हणजे दोघेही मूळचे काँग्रेस पक्षातील नसल्याने उपरे म्हणून होणार्‍या घुसमटीचा दोघांनाही अनुभव होता. त्यामुळे मोहन प्रकाश यांनी निरुपम यांना सांभाळून घेतले होते. मात्र आता मोहन प्रकाश नसल्याने निरुपम विरोधकांनी उचल घेतली आहे. खर्गे यांच्या कानी लागून त्यांनी मुंबई अध्यक्षांचा पत्ता कापला आहे.

गुरुदास कामत, मिलिंद देवरा, प्रिया दत्त, नसीम खान यांना निरुपम सुरूवातीपासून नको होते. पण, मोहन प्रकाश यांच्यापुढे त्यांचे काही चालत नव्हते. मात्र खर्गे येताच त्यांच्यापुढे या सर्वांनी मुंबई महापालिका निवडणुकीतील काँग्रेसच्या अपयशाचे पाढे वाचले. निरुपम यांच्या नेतृत्त्वाखाली महापालिकेच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेसला एवढ्या मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले. आम्हाला कोणाला विश्वासात न घेता निरुपम यांनी उमेदवारी दिल्याने काँग्रेसच्या नशिबी अपयश आले, असे या निरुपम विरोधकांचे म्हणणे आहे.

निरुपम यांना बाजूला सारून कृपाशंकर यांच्याबरोबर आमदार भाई जगताप यांच्या नावाचीही अध्यक्षपदासाठी चर्चा होती. पण, जगताप हे फटकळ असल्याने ते गटातटात विखुरलेल्या काँग्रेसला एकत्र आणू शकणार नाहीत, याची खात्री पटवण्यात कृपाशंकर समर्थक यशस्वी झाले. त्यामुळे शेवटी त्यांच्या नावावर एकमत झाले. कृपाशंकर यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप न्यायालयाच्या निकालाने आता धुवून निघाले असल्याने त्यांच्या नावाला प्राधान्य मिळाले आहे.

वरिष्ठांना खूश करण्यात कृपाशंकर वस्ताद

वरिष्ठांना खूश कसे ठेवायचे याची उपजत कला कृपाशंकर यांना अवगत आहे. काँग्रेस राजवटीत त्यांनी या कलेचा उपयोग करून आपले साम्राज्य निर्माण केले होते. खर्गे यांना खूश ठेवून त्यांच्या माध्यमातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहचण्यास कृपाशंकर यांना फारसा वेळ लागणार नाही.

First Published on: July 4, 2018 12:53 PM
Exit mobile version