साचलेल्या पाण्यात खेळताय ? सावधान ! मुंबईत लेप्टोचा सातवा बळी

साचलेल्या पाण्यात खेळताय ? सावधान ! मुंबईत लेप्टोचा सातवा बळी

तन्मय प्राज्ञे लेप्टोचा सातवा बळी

मुंबईत लेप्टोने डोके वर काढले असून लेप्टोने सातवा बळी घेतला आहे. कांदिवलीतील पोयसर येथील १६ वर्षीय मुलाचा एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईत पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. तुमची मूलही साचलेल्या पाण्यात खेळत असतील तर सावधान ! कारण लेप्टो अधिक बळावत आहे.

उपचारादरम्यान मृत्यू

तन्मय कमलेश प्राज्ञे असे मृत मुलाचे नाव असून तो कांदिवली विलेजमध्ये राहतो.२४ जुलैला तन्मयला अमर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ताप आणि उलटीचा त्रास त्याला होत होता. रक्त तपासणीत लेप्टो झाल्याचे निदान झाले. अमर रुग्णालयात लेप्टोच्या उपचारांसाठी लागणारी उपकरणं नसल्याने त्याला मालाडच्या रुग्णालयात हलवण्यात आले. पण उपचारादरम्यान तन्मय कोमात गेला. २८ जुलैला त्याचा मृत्यू झाला अशी माहिती तन्मयचे शेजारी किशोर राणे यांनी ‘मायमहानगर’ला दिली.

तलावात गेला पोहायला

तन्मय मूळचा दापोलीचा. त्याने ११वीत नुकताच प्रवेश घेतला होता. पाटकर महाविद्यालयात वाणिज्य शाखेत त्याला प्रवेश मिळाला होता. अॅडमिशन झाल्याच्या आनंदात तो मित्रांसोबत पोहायला गेला. संध्याकाळी पोहून घरी आल्यानंतर त्याला तीव्र ताप, उलटी आणि चक्कर येऊ लागली. त्यामुळे तन्मयच्या आई- वडिलांनी त्याला स्थानिक डॉक्टरांकडे नेले. तलावाच्या पाण्यात नाल्याचे पाणी मिसळल्याने त्याला लेप्टोची लागण झाली आणि आठवड्याभरात त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती त्याच्या शेजाऱ्यांनी दिली आहे.

4 जुलैला सिद्धीविनायक रुग्णालयात तन्मयला दाखल केल्यानंतर लेप्टोस्पायरोसिसवर उपचार करणे सुरू झाले. 2 दिवसानंतर तन्मयचे मल्टिपल ऑर्गन फेलीयर झाले व त्यानंतर रुग्णाने उपचाराला प्रतिसाद देण्याचे बंद केले,
अखेर त्याला व्हेंटिलेटरवर टाकण्याची वेळ आली. नातेवाईकांच्या परवानगीनेच तन्मयला व्हेटिलेटरवरून काढण्यात आले. आणि त्याला शनिवार सकाळी ४.१३वाजता मृत घोषित केले.
डॉ गोयल, सिद्धीविनायक रुग्णालय, मालाड

लेप्टोस्पायरोसिसची लक्षणे

लेप्टोचा प्रसार पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात होतो. या दिवसात सर्वत्र चिखल आणि पाण्याची डबकी तयार होतात. त्यामध्ये लेप्टोचे जीवाणू तयार होतात. त्याचबरोबर उंदीर, गाय, म्हैस, घोडा, मांजर, कुत्रा या प्राण्यांच्या विष्ठेतून आणि मुत्रातून लेप्टोस्पायरोसिस रोगाचा प्रसार होतो. या प्राण्यांच्या मुत्रातून बाधित जीवाणू पाणी आणि मातीत बरेच दिवस टिकून राहतात. हे मातीत किंवा पाण्यात असलेले जीवाणू व्यक्तींच्या पायाला असलेल्या छिद्रातून शरीरात प्रवेश करतात आणि त्या व्यक्तीला लेप्टोस्पायरोसिस हा रोग होतो.

First Published on: July 30, 2018 1:34 PM
Exit mobile version