Lockdown – लज्जास्पद! स्थलांतरीत मजुरांना जेवणाच्या ताटावरून हुसकावले

Lockdown – लज्जास्पद! स्थलांतरीत मजुरांना जेवणाच्या ताटावरून हुसकावले

देशभरात लॉकडाऊनच्या काळात अडकलेल्या गरजू लोकांना मदतीचा हात देऊन माणुसकीचे दर्शन घडत होते. मात्र भिवंडी तालुक्यातील दाभाड गावातील तुकाराम वाडी येथे जेवायला बसलेल्या मजूरांना  भरलेल्या ताटावरून उठवून इथून चालते व्हा,  असे सांगत या आदिवासी मजुरांना अक्षरशः हाकलून लावल्याची घटना घडल्याने परिसरात संतापाची लाट उसळली असून संबधीतांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.

देशामध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळावे म्हणून २२ मार्च पासून लॉकडाऊन आहे. अचानक लॉकडाऊन झाल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र या सगळ्या प्रक्रियेत सगळ्यात जास्त कामगार वर्ग व स्थलांतरीत कामगार होरपळून निघाला आहे तर हातावर पोट असणारा वीटभट्टी कामगार आणि नाक्यावर काम करण्यासाठी गेलेला स्थलांतरीत मजूर याची दखल घेऊन गेली चौदा दिवस श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमजीवी कार्यकर्ते गरीब गरजू भुकेल्या बांधवाना दिलासा देण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत.

रविवारी शटडाऊनमुळे अडकलेले ६ कामगार मजूर कुटुंब आपल्या मुलाबाळांसह घराच्या दिशेने पायी अनेक मैलांचे अंतर तुडवत निघाले होते. श्रमजीवी संघटनेचे युवा अध्यक्ष प्रमोद पवार यांना त्यांचे मित्र राजेश पाटील यांच्याकडून सहा मजूर मुला बाळांसह चालत येत असल्याची माहिती दिली. या मजुरांबाबत माहिती मिळताच त्यांनी या मजुरांना दाभाड येथील तुकाराम वाडीतील आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या बैठकीचे अधिष्ठान हॉल समोर असलेल्या अंगणात या मजुरांना थाबवले आणि त्यांच्या जेवणाची सोय केली. मात्र या मजुरांना जेवण वाढत असताना या हॉलपासून १०० फूट अंतरावर घर असलेल्या यशवंत बाळू घरत यांच्या कुटुंबाने अक्षरशः गोंधळ घातला. आमच्या अंगणात जेवायचे नाही,  इथून चालते व्हा, येथे अजिबात बसायचे नाही,  थांबायचे नाही, चालते व्हा,  गाडीत जेवायला द्या, स्वतःच्या घरी न्या असे सांगत या लोकांनी वाद घातल्याचा आरोप प्रमोद पवार यांनी केला आहे.  त्यामुळे अशा आणिबाणीच्या काळात समाजविरोधी वर्तन करणाऱ्या या घरत कुटुंबीयान विरोधात कायदेशीर कारवाई करणार असेही पवार यांनी म्हटले आहे.

First Published on: April 6, 2020 10:36 PM
Exit mobile version