Congress On BJP : पराभवाच्या धास्तीने मोदींकडून भाषणाच्या प्रत्येक वाक्यात काँग्रेस नामाचा जप

Congress On BJP : पराभवाच्या धास्तीने मोदींकडून भाषणाच्या प्रत्येक वाक्यात काँग्रेस नामाचा जप

मुंबई : मोदी सरकार घरात घुसून सर्जिकल स्ट्राईक करते असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परभणीच्या प्रचार सभेत सांगितले. पण नरेंद्र मोदी चीनला घाबरतात म्हणूनच चीनने भारताच्या सीमेत घुसखोरी करून जमीन बळकावली. चीनने आपले 20 सैनिक मारले तरीही नरेंद्र मोदींना आजपर्यंत ते कसे दिसले नाहीत, असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला आहे. तसेच पराभवाच्या धास्तीने मोदींकडून भाषणाच्या प्रत्येक वाक्यात काँग्रेस नामाचा जप होत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. (Lok Sabha Election 2024 Chanting the Congress name in every sentence of Narendra Modi’s speech in fear of defeat NaNa Patole )

पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचा समाचार घेत नाना पटोले म्हणाले की, नरेंद्र मोदींनी आज पुन्हा एकदा देशाच्या विभाजनाचा मुद्दा उपस्थित करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. विभाजनाला काँग्रेस जबाबदार असल्याचा मोदींचा आरोप धांदात खोटा आहे. आरएसएसच्या खोटे बोलण्याच्या तालमीत तयार झालेल्या नरेंद्र मोदींकडून वेगळी अपेक्षा करणे चुकीचेच आहे, परंतु पंतप्रधान पदावरील व्यक्तीने बोलताना अभ्यास करून बोलावे अशी अपेक्षा असते.

वास्तविक पाहता स्वातंत्र्य चळवळीत भाजपा, जनसंघ अथवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काहीही योगदान नाही. नरेंद्र मोदी ज्या विचारधारेचे प्रतिनिधित्व करतात तेच लोक मुस्लीम लीगबरोबर सरकारमध्ये सहभागी होते आणि त्याच परिवारातील संघटनेने द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला होता, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहीत असायला हवे. पंतप्रधान मोदी चुकीची माहिती देऊन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा – Aurangabad Constituency: पालकमंत्री संदीपान भुमरेंना शिवसेनेकडून उमेदवारी

मराठवाड्यातील शेतकऱ्यांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरडी चिंता आहे. सोयाबीन, बाजारी, ज्वारी, कापसाच्या पिकाचे महत्व सांगताना या पिकांना भाजपा सरकारच्या काळात भावच मिळला नाही, कवडीमोल भावाने विकावे लागले. मराठवाड्याचा शेतकरी संकटात असताना भाजपा मात्र शेतकऱ्यांना मदत देण्याऐवजी पक्ष फोडण्यात व्यस्त होता आणि आता निवडणुका आल्या की मोदींना शेतकऱ्यांची आठवण झाली. उज्वला गॅस, हर घर नल योजना, पंतप्रधान आवास योजना, मोफत रेशन या योजनांचा पाढा मोदींनी वाचला, परंतु 5 किलो मोफत धान्य देऊन गरिबांना महागाईच्या खाईत लोटले, उज्वला गॅसच्या नावाखाली गरिबांचे रॉकेल बंद केले व 1100 रुपयांचा गॅसही घेता येत नाही, अशा योजनांचा उपयोग काय? असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

पराभवाच्या धास्तीने मोदींकडून काँग्रेस नामाचा जप (Chanting the name of Congress by Modi in fear of defeat)

आपण गरिबी पाहिली असल्याने गरिबांसाठी काम करत असल्याचे मोदींनी सांगितले, पण मोदींच्या 10 वर्षाच्या काळातच देशातील गरिब अधिक गरिब झाला आहे. गरिबाला जगणे कठीण झाले आहे. नरेंद्र मोदी यांनी भाषणात सातत्याने काँग्रेस नावाचा जप केला. काँग्रेस पक्षाला देशभरात मिळत असलेले जनसमर्थन व भाजपाचा पराभव स्पष्ट दिसत असल्याने पराभवाच्या धास्तीने नरेंद्र मोदी भाषणात काँग्रेस नामाचा जप करत आहेत, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.

हेही वाचा – Lok Sabha : पीयूष गोयल यांच्याकडून आचारसंहितेचे उल्लंघन; उमेदवारी रद्द करण्याची काँग्रेसची मागणी

Edited By – Rohit Patil

First Published on: April 20, 2024 7:56 PM
Exit mobile version