Lok Sabha : मोदीमुक्त भाजपा आणि भाजपमुक्त भारत असा नवा नारा, ठाकरे गटाचा घणाघात

Lok Sabha : मोदीमुक्त भाजपा आणि भाजपमुक्त भारत असा नवा नारा, ठाकरे गटाचा घणाघात

मुंबई : भाजपा हा राष्ट्रभक्तांचा पक्ष नसून भ्रष्टाचाराचे गोदाम आहे. जगातले सगळ्यात मोठे वसुली रॅकेट आहे. अशा वसुली रॅकेटच्या सरदारांना जनता पराभूत करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काँग्रेसमुक्त भारत करायला निघाले होते, पण ‘मोदीमुक्त भाजपा आणि भाजपमुक्त भारत’ असा नवा नारा देशात घुमू लागला आहे, असा घणाघात ठाकरे गटाने केला आहे.

मोदी घरच्याच वृत्तवाहिन्यांना मुलाखती देत आहेत. एखादी जाहीर पत्रकार परिषद घेऊन देशाशी संवाद साधावा, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत, असे पंतप्रधान मोदी यांना कधीच वाटले नाही. कारण तेवढा आत्मविश्वास या माणसाकडे नाही, अशी जहरी टीका सामना दैनिकातील अग्रलेखातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : …तर मोदी यांचा रथ दिल्लीच्या सीमेवरच अडखळेल, ठाकरे गटाने मांडला तर्क

वरुण गांधी यांना भाजपाने दूर केले आहे. अमेठी ही संजय गांधी यांची जागा आहे. म्हणजे गांधी परिवाराची सुरुवात अमेठीतून संजय गांधी यांनीच केली. संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधी अमेठीत आले. रायबरेलीत इंदिरा गांधी होत्या आणि नंतर सोनिया गांधी आल्या. त्यामुळे काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला तर वाराणसी आणि अमेठी या मतदारसंघांचा निकाल वेगळा लागू शकेल, असा दावा ठाकरे गटाने या अग्रलेखातून केला आहे.

वाराणसीतून प्रियंका गांधी लढणार आहेत असे काँग्रेसने फक्त जाहीर केले तरी, विश्वगुरूंचे पाय लटपटतील. काँग्रेसने फक्त धाडसाने पुढे जायला हवे. पक्षाने सांगितले तर ‘करू’ हे राहुल गांधी यांचे बोलणे शिस्तीच्या चौकटीतील झाले, पण गांधी म्हणजेच काँग्रेस पक्ष हेच धोरण आजही आहे आणि लोकांनी ते स्वीकारले आहे, असे ठाकरे गटाने सुनावले आहे.

राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढली हे नक्कीच. ‘भारत जोडो’ यात्रेचे उत्तर प्रदेशात मोठे स्वागत झाले, पण काँग्रेसची संघटना विस्कळीत आहे. राहुल गांधी मैदानात असतील तरच त्यास गती येईल, असे सांगून ठाकरे गटाने या अग्रलेखात म्हटले आहे की, सोनिया गांधी राज्यसभेत निवडून आल्या आहेत, पण गांधींशिवाय रायबरेली आणि अमेठी हे उत्तरेतील लोकसभा मतदारसंघ लोकांना मान्य नाहीत, असा दावा ठाकरे गटाने केला आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : मोदींच्या विकसित भारताला पाठिंबा देण्यासाठी मतदान करा, बावकुळेंचे आवाहन


Edited by – Manoj S. Joshi

First Published on: April 19, 2024 12:36 PM
Exit mobile version