घरदेश-विदेशLok Sabha 2024 : ...तर मोदी यांचा रथ दिल्लीच्या सीमेवरच अडखळेल, ठाकरे...

Lok Sabha 2024 : …तर मोदी यांचा रथ दिल्लीच्या सीमेवरच अडखळेल, ठाकरे गटाने मांडला तर्क

Subscribe

मोदी यांची जुमलेबाजी आता चालणार नाही. विष्णूच्या तेराव्या अवताराचा पराभव काशीनगरीत करण्याचा विडा गांधी आणि अखिलेश यांनी उचलायला हवा. कारण हा तेरावा अवतार खरा नाही, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

मुंबई : उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या 80 जागा दिल्लीतील सत्तास्थापनेसाठी निर्णायक ठरतात. उत्तरेतील गणित जमल्याशिवाय दिल्लीची बेरीज होत नाही, असे सांगितले जाते. काँग्रेसने यावेळी उत्तर प्रदेशात आठ-नऊ जागांची मजल मारली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रथ दिल्लीच्या सीमेवरच अडखळेल. उत्तर प्रदेशात भाजपाचा आकडा मोठाच राहील. तो किमान 20-25 ने कमी करता आला तरी मोदी यांच्या हुकूमशाहीची कबर खणलीच म्हणून समजा, असा तर्क ठाकरे गटाने मांडला आहे. (Lok Sabha Elections 2024: Thackeray group has calculated the defeat of BJP)

उत्तरेत समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची हातमिळवणी झाली आहे, पण मायावती म्हणजे ‘बसपा’चा हत्ती भयग्रस्त असल्याने त्याने वेगळा मार्ग निवडला आहे. आता यादव-गांधी युती झाली तरी स्वतः राहुल गांधी अमेठीत लढणार नाहीत. त्यामुळे यादव-गांधी हातमिळवणीचा घोडा पुढे जाणार नाही, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

- Advertisement -

राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढली हे नक्कीच. ‘भारत जोडो’ यात्रेचे उत्तर प्रदेशात मोठे स्वागत झाले, पण काँग्रेसची संघटना विस्कळीत आहे. राहुल गांधी मैदानात असतील तरच त्यास गती येईल, असे सांगून ठाकरे गटाने या अग्रलेखात म्हटले आहे की, सोनिया गांधी राज्यसभेत निवडून आल्या आहेत, पण गांधींशिवाय रायबरेली आणि अमेठी हे उत्तरेतील लोकसभा मतदारसंघ लोकांना मान्य नाहीत, असा दावा ठाकरे गटाने केला आहे.

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने निर्देश दिल्यास आपण अमेठीतूनही लढू, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. राहुल गांधी यांच्या निरागसतेचे हे लक्षण आहे. 2019मध्ये अमेठीतून गांधी यांचा पराभव झाला. तेव्हापासून गांधी घराण्याच्या या परंपरागत मतदारसंघावरून गांधी यांचे मन उडालेले दिसते. या वेळी रायबरेली आणि अमेठी या गांधीछाप मतदारसंघांत गांधी घराण्यातील कुणीच लढणार नाहीत. राहुल गांधी हे केरळातील वायनाड येथून उमेदवार आहेत आणि तब्येतीच्या कारणामुळे सोनिया गांधी लोकसभा लढणार नाहीत, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

- Advertisement -

मोदी यांची जुमलेबाजी आता चालणार नाही. विष्णूच्या तेराव्या अवताराचा पराभव काशीनगरीत करण्याचा विडा गांधी आणि अखिलेश यांनी उचलायला हवा. कारण हा तेरावा अवतार खरा नाही. हिंदू देवता भगवान विष्णूचे दहा प्राथमिक अवतार आहेत. आता भाजपाने मोदींना तेरावे अवतार घोषित केले. मोदी हे मनुष्य नसून अवतार आहेत असे सांगणारे हिंदुत्वाचाच अपमान करतात. त्यांचा पराभव होणे गरजेचे आहे. अमेठी, रायबरेली आणि वाराणसीकडे देशाचे लक्ष आहे, हे काँग्रेसने विसरू नये, असा सल्लाही ठाकरे गटाने दिला आहे.


Edited by – Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -