अतिक्रमणे हटवल्याने महालक्ष्मी रेल्वे स्थानक उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा  

अतिक्रमणे हटवल्याने महालक्ष्मी रेल्वे स्थानक उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा  

मुंबई महापालिकेमार्फत केशवराव खाड्ये मार्ग, महालक्ष्मी रेल्वे स्थानक येथे रेल्वेमार्गावर उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. या पुलाच्या बांधकामाला अडथळा ठरणाऱ्या ४८ पैकी १६ बांधकामे पहिल्या टप्प्यात हटविण्यात आली आहेत. त्यामुळे महालक्ष्मी रेल्वे स्थानक येथील उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा झाला आहे.
उपायुक्त विजय बालमवार, सहाय्यक आयुक्त मनीष वळंजू यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता श्री. शफी मोमीन, सहाय्यक अभियंता दीपक झुंजारे, दुय्यम अभियंता प्रवीण मुळूक, कनिष्ठ अभियंता दीनानाथ पालवी यांनी ही अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही पार पाडली.

मुंबई महापालिकेमार्फत संत गाडगे महाराज चौक (सातरस्‍ता) येथून केशवराव खाड्ये मार्गावर हाजीअलीच्‍या दिशेने केबल स्‍टेअड पद्धतीने पूल बांधण्‍यात येणार आहे. हा पूल सध्‍याच्‍या महालक्ष्‍मी पुलावरील वाहतूक कमी करण्‍यासाठी मदतकारक ठरणार आहे. तसेच सध्‍या काम सुरु असलेल्‍या कोस्टल रोडवरून येणारी आण‍ि दक्षिण मध्‍य मुंबईकडे जाणारी वाहतुकही सुरळीत होणार आहे.

हा उड्डाणपूल महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेमार्गावर बांधण्यात येणार आहे. मात्र या उड्डाण पुलाच्या बांधकामामध्ये या परिसरातील ४८ बांधकामे बाधित होत आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील १६ बांधकामे हटविण्याचे काम सोमवारी पार पाडण्यात आले.

आता या बाधित व पात्र झोपडीधारकांचे ‘ई’ विभाग कार्यालयामार्फत कायदेशीररित्या पर्यायी जागेत पुनर्वसन करण्यात आले आहे. ही १६ अतिक्रमणे काढल्यामुळे उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामाचा मार्ग मोकळा झालेला आहे.
पुढील अतिक्रमणे काढण्यासाठी, बाधितांचे पुनर्वसन करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून येत्या काही दिवसांत ती पूर्ण करुन उर्वरित अतिक्रमणे देखील हटविण्यात येणार आहेत.


हेही वाचा – पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज मंडईच्या जागेत दिवसा दारुच्या पार्ट्या!

First Published on: October 25, 2021 9:02 PM
Exit mobile version