बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी १०० कोटींचा निधी मंजूर

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी १०० कोटींचा निधी मंजूर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी निधी मंजूर झाला आहे. स्मारकासाठी १०० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता लवकच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक उभे राहणार आहे. दरम्यान, सुरुवातीला हा खर्च एमएमआरडीए करणार आहे.

१०० कोटींचा निधी मंजूर

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी निधी मंजूर करण्याबाबत प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावाला अखेर मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे. १०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असल्याने आता लवकरच बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभे राहणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच स्मारक महापौर बंगला परिसरात उभारण्याचा मार्ग मोकळा झाला होता. महापौर बंगल्याच्या परिसरातील जमिनीखाली हे स्मारक उभारले जाणार आहे.

भाजपसाठी बाळासाहेब ठाकरे श्रध्देय

बाळासाहेब ठाकरे हे एकाच पक्षाचे नेते नव्हते. तर, ते सर्व देशाचे नेते होते. भाजपसाठी बाळासाहेब ठाकरे हे श्रद्धेयआहेत. युती व्हावी या उद्देशाने स्मारकाचा निधी दिला नसल्याचे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.

उद्या गणेश पूजनाचा कार्यक्रम

दरम्यान, स्मारकाचा खर्च १०० कोटी इतका आहे. ते पैसे तातडीने एमएमआरडीला सुपूर्द केले जातील. सर्व परवानग्या आम्ही घेतलेल्या आहेत. स्मारकासाठी निविदा काढल्या जातील. निविदेची प्रक्रीया एमएमआरडीएकडून केली जाणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. एका आठवड्याच्या आत निविदा काढण्यात येतील. उद्या गणेश पूजनाचा कार्यक्रम आहे. जागेचे हस्तांतरण होईल. या जागेचे आरक्षण महापौर निवासऐवजी स्मारक असं केले जाणार, असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील अन्य महत्त्वाचे निर्णय

१. दिव्यांग व्यक्तींच्या स्वावलंबनासाठी हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) मोफत उपलब्ध करण्याचा निर्णय.

२. मुंबई शहरातील सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र शासन पुरस्कृत महिला सुरक्षितता पुढाकार योजना राबविण्यास मान्यता.

३. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज या स्वायत्त संस्थेचे रुपांतर फर्ग्युसन युनिव्हर्सिटीमध्ये करण्यास मान्यता.

First Published on: January 22, 2019 2:13 PM
Exit mobile version