आजपासून राज्यात जमावबंदी; रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत निर्बंध लागू

आजपासून राज्यात जमावबंदी; रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत निर्बंध लागू

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात आज, रविवारी मध्यरात्रीपासून १५ एप्रिलपर्यंत सर्वत्र रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबादमध्ये निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. मुंबईत कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने मुंबई महानगरपालिकेने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या नियमावलीनुसार राज्यात रात्रीच्या जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. ज्यामध्ये पाचहून अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी असून रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत जमावबंदी कायम असणार आहे. यामध्ये नाक आणि तोंड झाकण्यासाठी मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे या नियमांचं पालन अनिवार्य असेल. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याऱ्यांस दंड ठोठावण्यात येणार आहे, शिवाय मद्य, पान, गुटखा, तंबाखू या पदार्थांचं सार्वजनिक ठिकाणी सेवन करण्यासही बंदी असेल.

सर्व मॉल्स, सिनेमागृह, सभागृह, कार्यक्रम स्थळं, रेस्तराँ रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत बंद असतील. होम डिलीव्हरीसाठी मात्र निर्बंध नाही. यासह मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीकडून ५०० रुपये आणि रस्त्यात थुंकणाऱ्या व्यक्तीकडून १००० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.

असे आहेत नवे निर्बंध

राज्यात मागील २४ तासांत राज्यात ३५ हजार ७२६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १६६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १४ हजार ५२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २६ लाख ७३ हजार ४६१वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५४ हजार ७३ जणांचा मृत्यू झाला असून २३ लाख १४ हजार ५७९ जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या ३ लाख ३ हजार ४७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

First Published on: March 28, 2021 8:50 AM
Exit mobile version