राजपथावर महाराष्ट्राचा ‘छोडो भारत’ चित्ररथ

राजपथावर महाराष्ट्राचा ‘छोडो भारत’ चित्ररथ

India Gate

राजपथावर प्रजासत्ताक दिनी होणार्‍या पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्यावतीने 1942 च्या चळवळीची हाक देणारे मुंबई येथील ऑगस्ट क्रांती मैदानावरील ‘छोडो भारत चळवळ’ वर आधारित चित्ररथ सादर होणार आहे. यावर्षी भारताच्या 70व्या प्रजासत्ताक दिनी इंडियागेट वरील राजपथावर देशातील 15 राज्यांचे चित्ररथ मार्गक्रमण करणार आहेत. देशभरातून एकूण 29 राज्यांनी राजपथावरील चित्ररथ प्रदर्शनासाठी दावेदारी केली होती. त्यानंतर महाराष्ट्रासह देशातील 15 राज्यांच्या चित्ररथांची निवड या गौरवपूर्ण कार्यक्रमासाठी झाली आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राची हीच गौरवशाली परंपरा कायम ठेवत महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षाचे निमित्त साधून यावर्षी महाराष्ट्राच्यावतीने मुंबई येथील ऑगस्टक्रांती मैदानावरील ‘छोडो भारत चळवळ’ दर्शविणारा चित्ररथ राजपथावर प्रदर्शित होणार आहे. चित्ररथाच्या पुढील भागात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा दृढ निश्चय व करूणामयी स्वभाव दर्शविणारी मोठी प्रतिमा उभारण्यात येणार आहे. स्वदेशीचे वस्तूंचे प्रतिक असणारा ‘चरखा’ आणि मुंबईची खास ओळख ‘गेट वे ऑफ इंडिया’ च्या मोठ्या प्रतिमा चित्ररथावर उभारण्यात येणार आहेत. तसेच 1942 मध्ये तत्कालीन गवालीया टँक अर्थात ऑगस्ट क्रांती मैदानवर झालेले ‘छोडो भारत चळवळी’ ची भव्यता दर्शविणारा जनसागर चित्ररथाच्या दोन्ही बाजूस विविध म्युरल्सच्या माध्यमातून दर्शविण्यात येणार आहे. चित्ररथ व त्याच्या आजुबाजुला एकूण 35 कलाकार असतील. सांस्कृतिक संचालनालयाच्या संचालक स्वाती काळे यांच्या निरीक्षणाखाली आणि राज्याच्या चित्ररथाचे संकल्पनाचित्र जागतिक ख्यातीचे कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी केले आहे.

महाराष्ट्र सात वेळा प्रथम क्रमांकाचा मानकरी
राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने दिल्लीतील राजपथावर राज्याचे वैशिष्ठ्य दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची दीर्घ परंपरा आहे. राज्याने सादरीकरणासाठी आतापर्यंत सात वेळा प्रथम क्रमांक पटकवला आहे. यापूर्वी 1980 मध्ये राज्याच्यावतीने ‘शिवराज्याभिषेक’ दर्शविणारा चित्ररथ साकारला होता. त्याला प्रथम पारितोषिक मिळाले होते. 1983 मध्ये ‘बैल पोळा’ या चित्ररथासही प्रथम क्रमांक मिळाला. यानंतर 1993 ते 1995 मध्ये सलग 3 वर्ष प्रथम क्रमांकाचा मान महाराष्ट्राला मिळाला होता. 2015 मध्ये साकारलेल्या ‘पंढरीची वारी’ आणि 2018 मध्ये बनवलेल्या ’छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा’ या चित्ररथांना पहिला क्रमांक मिळाला होता.

First Published on: January 7, 2019 5:15 AM
Exit mobile version