महेश नार्वेकर तीन वेळा कोरोना पॉझिटिव्ह होते, तरिही मुंबईकरांसाठी झटत राहिले

महेश नार्वेकर तीन वेळा कोरोना पॉझिटिव्ह होते, तरिही मुंबईकरांसाठी झटत राहिले

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात महापालिकेकडे पुरेशा खाटा, रुग्णवाहिका आणि शववाहिका उपलब्ध  नव्हत्या. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला की त्यांना रुग्णालयात दाखल करण्यापासून ती बोंब सुरु व्हायची. ती त्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधी पार पडेपर्यंत. त्यामुळे लोकांमध्ये एक भयावह परिस्थिती पसरली होती. या यासर्व यंत्रणांची जबाबदारी ही आपत्कालिन नियंत्रण कक्षाचे प्रमुख अधिकारी महेश नार्वेकर यांच्यावर होती. अशा परिस्थितीत त्यांचे उपप्रमुख अधिकारी आणि  प्रशिक्षित  २८ कर्मचारी कोरेाना बाधित झाले. पण त्यांनी कंत्राटी कामगारांना हाताशी धरुन त्यांनी १९१६ ही हेल्पलाईनवरील सेवा अविरत सुरुच ठेवली. पण शेवटी तेही कोरेाना बाधित  निघाले. एकदा नव्हेत तिनदा त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. पण त्यांनी या आजाराला कवटाळयाऐवजी त्यांनी क्वारंटाईनमध्ये बसून या यंत्रणेत कुठेही खंड पडणार नाही याची काळजी घेत आपलं कर्तव्य निभावलं.

मुंबईत जेव्हा ११ मार्च रोजी कारोनाचा पहिला रुग्ण आढळून आला तेव्हापासून महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेबरोबरच महापालिकेचे  आपत्कालिन नियंत्रण कक्ष तेवढाच अग्रेसर होत काम करत होता. पुढे या नियंत्रण कक्षाचे रुपांतर कोरोना कोविड १९च्या  नियंत्रण कक्षात  झाले. पण याच कक्षात बसून सनदी अधिकारी मनिषा म्हैसकर, अश्विनी भिडे,  रामास्वामी आदी शासन नियुक्त अधिकारी कोरेानाच्या आकडेवारीसह उपाययोजनांवर लक्ष ठेवून होते. त्यामुळे आपत्कालिन  नियंत्रण कक्षातील १९१६ ही हेल्पलाईन कोरेाना बाधित रुग्णंच्या सेवेसाठी कार्यरत करण्यात आली. या आपत्कालिन नियंत्रण कक्षासह या विभागाचे प्रमुख महेश नार्वेकर यांच्यावर महापालिका, खासगी तसेच आरोग्य केंद्रांमध्ये खाटा उपलब्ध करून देण्याबरोबरच रुग्णवाहिका व शववाहिका उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सोपवली होती. ही यंत्रणा राबवताना नार्वेकर यांचा कानाचा फोन कधी खाली उतरलाच जात नव्हता. पहिल्या अडीच ते तीन महिन्यातील त्या अनुभवाबाबत ते सांगतात, ते दिवस माझ्यासाठी फारच वाईट होते. खूपच वाईट परिस्थितीतून मला जावे लागले होते. नियंत्रण कक्षातील पहिले दोन कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्यानंतर एकामागोमाग एक असे २८ कर्मचारी पॉझिटिव्ह निघाले होते. उपप्रमुख अधिकारी रश्मी लोखंडेसह. आधीच माणसे नाहीत. अवघी चार ते पाचच माणसे कंट्रोलरुममध्ये. आधीच कोरोनाबाबत लोकांची समज कमी आणि त्यातच फोन नाही लागला की १९१६च्या नावाने बोंबाबोंब व्हायची. माझ्याकडे माणसेच नाही तर मी काय करू? बरं तरी पण मी ४० माणसे काँट्रक्टवर भरली. त्यांना कल्पतरुच्या नियंत्रण कक्षात जागा करून देत पर्यायी सिस्टीम चालवली.पण ती मुलं नवीन. फोन कसा घ्यायचा. बेड कसा उपलब्ध करून द्यायचा याची माहितीही नव्हती. बरं तेव्हा डॅशबोर्डही नव्हता.जेवढं जमत होतं तेवढं ते करत होते. त्यामुळे मग तक्रारी वाढू लागल्या. मग सर्वांचा रोष माझ्यावर. त्यावेळी मी  सुरक्षा खात्यातील निवृत्त उपप्रमुख सुरक्षा अधिकाऱ्यांची सहा महिन्यांकरता ओएसडी म्हणून नियुक्ती करून त्यांची मदत घेतली.

एप्रिल, मेच्या त्या सुरुवातीच्या काळामध्ये बेड मिळताना मारामारी होती. केवळ हजारेक बेड होते. पुरेशा रुग्णवाहिका नव्हत्या. शववाहिकाही केवळ २० होत्या. त्यातच त्यावर अटेंडन्स नसायचे. शववाहिकांच्या स्मशानात रांगा लागायच्या. ती बोंबाबोंब, एक बॉडी घेवून शववाहिका गेली की त्याला पाच ते सहा तास जायचे. अशी भयानक परिस्थिती होती.  आणि माझ्याकडे कार्यभार काय तर यासर्व यंत्रणा उपलब्ध करून द्यायच्या. म्हणजे त्यावेळच्या परिस्थितीतील एक क्रिटीकल पार्टच होता तो.

 आणि दुसरीकडे नियंत्रण कक्षातील ७० ते ८० टक्के कर्मचारी बाधित झाल्यामुळे घरी किंवा रुग्णालयात होते. उप प्रमुख अधिकाऱ्यासह.सर्व कोरोनाबाधित. मग कंट्रोल रुम चालवायचा कसा. दिवसभरात साडेचार ते पाचह जार कॉल्स १९१६ सह इतर क्रमांकावर यायचे. तरीही मी रेटून नेत जास्तीत जास्त लोकांना बेड उपलब्ध करून दिले.आता आपल्याकडे १७ हजार बेड आहेत. आयसीयू वाढले.व्हेंटीलेटर वाढले ६७५ रुग्णवाहिका झाल्या. ३९ शववाहिका झाल्या. वॉर्ड कंट्रोलरुम बनला. लोकांमध्ये समज पण आली.त्यामुळे आता हळूहळू परिस्थिती नॉर्माल होवू लागली.

तेव्हा रात्रीच्यावेळी होणाऱ्या पळापळीबाबत ते सांगतात, सुरुवातील आरोग्य खाते हे टेस्टचे रिपोर्ट रात्री आठ वाजता द्यायचे. त्यामुळे मग रात्रीची लोकांची बेडसाठी पळापळ सुरु व्हायची. मग रात्री मला फोन सुरु. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला म्हटलं की पेशंट अगदी घाबरुन जायचा. तेव्हा आजच्या एवढी लोकांमध्ये समजही  नव्हती. त्यामुळे पॉझिटिव्ह आला म्हणजे बेड पाहिजेच. त्यामुळे पहाटेपर्यंत बेडसाठी शोधाशोध सुरु व्हायची ती तो रुग्ण दाखल होईपर्यंत. प्रत्येक रात्र ही अशीच गेली. पण रात्री उशिरा टेस्टचा रिपोर्ट देणे हे चुकीचे असल्याचे मी आयुक्त साहेबांच्या निदर्शनास आणून दिलं. आरोग्य खाते रिपोर्ट देवून झोपून जातं. पण मी बेड उपलब्ध होईपर्यंत जागाच. मग आयुक्तांना हे पटलं आणि त्यांनी सकाळी आठ वाजता टेस्टचे रिपोर्ट द्यायला सांगितले. तेव्हापासून हे रिपोर्ट सकाळचे येवू लागले.

 त्यानंतर वॉर रुम २४ विभागांमध्ये विभागलं गेलं. माझा विभागातील जो स्टाफ होता,तो मी तिथे पाठवला. आता तिथे डॉक्टर्स दिले. महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल साहेबांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला. ज्यामुळे सर्वांच्याच डोक्यावरील भार बराच कमी झाला आहे. त्याचे चांगले परिणाम आज दिसत आहेत. त्यावेळी पेशंट आमच्याकडे यायचे. पण आता आता आम्ही पेशंटकडे जातो. उलटं झालं आता.. महापालिका अॅट दि डोअर ऑफ पेशंट. आम्ही फोन करतो, त्यांच्या घरी जातो, त्यांची तपासणी करतो. त्यांना रुगणालय देतो. रुग्णवाहिका देतो.

सर्व सहकारी कोरेानाबाधित झाल्यानंतरही एक हाती खिंड लढवणाऱ्या या अधिकाऱ्याला कोरोनाने खिंडीत गाठलेच. त्याविषयी ते सांगतात. १३ जून रोजी मी ऑफीसमधूनघरी गेलो आणि मला डायरेक्ट १०५ डिग्री ताप. दुसऱ्या दिवशी बराही झालो. पण माझी मुलगी डॉक्टर असल्यामुळे तिने मला टेस्ट करून घेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे मी सोमवारी टेस्टसाठी  बोलावले, मंगळवारी ती लोक आली घरी. तिघांचीही टेस्ट केली. त्यात मुलगी आणि बायको दोघी निगेटिव्ह आणि मी पॉझिटिव्ह. मग तसाच उठलो, गाशा गुंडाळला आणि हॉटेल रेनिसन्समध्ये आलो. तिथे राहिलो, मग दहा दिवसांनी पुन्हा टेस्ट केली. तशी मला काही लक्षणेच नव्हतीच. मग परत टेस्ट पॉझिटिव्ह आली. मग तिथून उठलो आणि हॉटेल वेस्टईनला आलो. तिकडे राहिलो, तिकडे परत टेस्ट केली. २३ जुनला ती परत पॉझिटिव्ह आली. तीन टेस्ट एकामागोमाग पॉझिटिव्ह आल्या. मग डॉक्टर म्हणाले, सिटीस्कॅन करावे लागतील. रक्तचाचणी करून घ्या. कदाचित आतमध्ये इन्फेक्शन झाले असणार. मग टेस्ट केले. तर सर्व  रिपोर्ट निगेटिव्ह आले. मग चार जुलैला परत केली ती निगेटिव्ह आली. मग ७ तारखेला पुन्हा कामावर हजर झालो.

माझी सहकारी रश्मी लोखंडे एक महिना रुग्णालयात दाखल होती. ती ऑक्सिजनवर होती. पण मला लक्षणे नसल्याने मी हॉटेलमध्ये स्वतंत्र राहिलो आणि तिथूनच काम करायचो. मला फोन चालूच होते. लोकांना कुठे माहित होते मी पॉझिटिव्ह आहे तो.त्यामुळे लोक मला फोन करायचे. दिवस-रात्र .  त्यामुळे उपचार सुरु असतानाही माझे काम सुरुच होतं. आज सर्वच यंत्रणा योग्यप्रकारे उपलब्ध झाल्यामुळे मुंबई बाहेरील रुग्णही मुंबईतील रुग्णालय व समर्पित आरोग्य केंद्र तथा जम्बो फॅसिलिटीमध्ये दाखल करून घेतले जातात. सुरुवातीला एक आव्हान होते. पण आता मुंबईतील रुग्ण कमी झाले आणि मृत्यूचे प्रमाणही घटले. आता उलट आसपासच्या भागांमध्ये वाढू लागले.त्यामुळे मुंबई महानगर परिसरातील रुग्णांनाही मुंबईत उपचार सेवा उपलब्ध करून  दिली जात आहे.


हे ही वाचा – कॅप्टन एकाच ठिकाणी असणं महत्त्वाचं, पवारांकडून मुख्यमंत्र्यांची पाठराखण!


 

First Published on: July 25, 2020 7:32 PM
Exit mobile version