माहुलवासियांचे पुनर्वसन करा, ४८ तासांचा अल्टिमेटम

माहुलवासियांचे पुनर्वसन करा,  ४८ तासांचा अल्टिमेटम

पुर्नवसनाच्या मागणीसाठी एकत्र आलेले माहुलवासी

मुंबईमधील विविध प्रकल्पांमध्ये बाधित झालेल्यांचे पुनर्वसन माहुल येथे करण्यात आले आहे. माहुल परिसरात प्रदूषण असल्याने न्यायालयाने तेथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन इतर ठिकाणी करावे, असे आदेश दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी केली जात नसल्याने माहुलवासियांनी पालिकेच्या एम पश्चिम कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी महापालिकेला ४८ तासांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे,अशी माहिती जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी दिली.

मुंबईमधील तानसा पाईपलाईन तसेच रोड कटींगमधील रहिवाशांना माहुलमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. हायकोर्टाने माहुल परिसरात प्रदूषण असल्याने पुनर्वसन करू नये, असे आदेश दिले होते. या आदेशाविरोधात माहुलमध्ये पुनर्वसन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाने खोटे रिपोर्ट सादर केले. ते रिपोर्ट नंतर त्यांना बदलावे लागले. माहुलमधील प्रकल्पग्रस्तांना देण्यात आलेल्या सोयीसुविधांबाबत सरकार आणि पालिकेने भ्रमित केले. यामुळे आयआयटीला परिसराचा अभ्यास करण्यासाठी १६ लाख रुपये देऊन नेमावे लागल्याचे पाटकर यांनी सांगितले.
महापालिकेत डिझास्टर मॅनेजमेंट सेल आहे. त्याचे संचालक वॉर्ड ऑफिसर असतात. परंतु डिझास्टर मॅनेजमेंटच्या वॉर्डमधील कार्यालयात आयपीसीएलच्या लोकांना भरती करण्यात आले आहे. तसेच पालिकेने डिझास्टर मॅनेजमेंटचा सर्वांगिण अभ्यासही केला नसल्याचा आरोप पाटकर यांनी केला.

माहुलमध्ये प्रदूषण असल्याने हा परिसर राहण्यास योग्य नाही. तेथे राहणार्‍या लोकांचे भविष्य आणि आयुष्य सुरक्षित नाही हे कोर्टाने मान्य केले. यामुळे आता माहुलमध्ये कुणाचेही पुनर्वसन करू नये. ज्यांना घरांच्या चाव्या दिल्या आहेत त्या पुन्हा परत घ्याव्यात, असा निर्णय ३ ऑगस्ट रोजी हायकोर्टाने दिला. दोन दिवसापूर्वी येथील प्लांटला आग लागली यामुळे लोकांनी धावाधाव करून आपली घरे खाली केली. येथील लोकांनी रात्र बाहेर जागून काढली आहे. त्यांच्या मदतीला कोणीही धावून आलेले नाही. माहुलमधील लोकांचे आयुष्य आजही धोक्यात आहे. त्यांना तात्पुरते का होईना स्थलांतरित केले पाहिजे , असे पाटकर यांनी सांगितले. आम्ही आज वॉर्ड ऑफिसरांना भेटलो. त्यांना ४८ तासांची मुदत दिली आहे. या कालावधीत त्यांनी प्रकल्पग्रस्तांचे इतरत्र पुनर्वसन करावे, अशी मागणी पाटकर यांनी केली.

रात्री पुन्हा स्फोट
३० ते ३३ हजार लोक वास्तव्य करत आहेत. दीड वर्ष लोक तिथे पीडित आहेत. दोन दिवसांपूर्वी रिफायनरीला आग लागली तेव्हा स्फोट झाला. गुरुवारी रात्रीही स्फोटाचा मोठा आवाज झाला. लोक भयभीत आहेत. लोकांनी रात्र जागून काढली. आम्हाला आता माहुल एसआरए म्हाडा कॉलनीमध्ये राहायचे नाही. आमचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करावे.
– अनिता ढोले

मोर्चात ‘आपलं महानगर’ची चर्चा
आमचा आवाज, आमचे दुःख आज दैनिक ‘आपलं महानगर’ ने पालिका आणि सरकारपर्यंत पोहचवले आहे. यामुळे आमच्या समस्या आणि त्रास सरकारला समजेल. महानगरची बातमी वाचली का? महानगर वाचला का? असे प्रश्न मोर्चेकरी एकमेकांना विचारत होते. महानगरमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि वेबवरील बातम्यांच्या लिंकही मोठ्या प्रमाणात रहिवासी वाचत आहेत.

First Published on: August 11, 2018 5:00 AM
Exit mobile version