माझे कुटुंब, माझी जबाबदारीची ‘त्या’ चार राज्यांना गरज!

माझे कुटुंब, माझी जबाबदारीची ‘त्या’ चार राज्यांना गरज!

मुंबई महानगर पालिका

एका बाजूला शेजारच्या राज्यांचा धोका आणि दुसऱ्या लाटेची भीती लक्षात घेता मुंबईत ही भीती तशी कमीच असल्याचे बोलले जात आहे. त्यातच मुंबईसह राज्यात सुरु असलेली माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेसह विनामास्कच्या लोकांवर सुरु असलेल्या कारवाईमुळे दुसऱ्या लाटेची शक्यताच नाही. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार राबवण्यात येणाऱ्या मोहिमांची अंमलबजावणी इतर राज्यांमध्ये होत नसल्याने तिथे करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे इतर राज्यांमध्ये महाराष्ट्राप्रमाणे मोहीम राबवल्यास दुसऱ्या लाटेचा प्रभाव भारतातही कमी होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मुंबईत संभाव्य करोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. गणपतीप्रमाणे दिवाळीमध्येही रुग्ण वाढले जातील अशी भीती वर्तवली जात असतानाच शेजारच्या राज्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने ही भीती अधिकच वर्तवली जात आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता मुंबई महापालिकेने विशेष काळजी घेत सर्व यंत्रणांना सतर्क केले आहे.

करोनाच्या टास्कफोर्समधील तज्ज्ञांच्या मते ज्या उपाययोजना मुंबई राबवते, त्या दिल्लीसह गुजरात, गोवा आणि राजस्थानमध्ये राबवल्या जात नाहीत. त्यामुळे मुंबईसह राज्यात कोरोनाचा आजार आटोक्यात येताना दिसत आहे. मुंबईसह राज्यात कोरोनाचा आजार नियंत्रणात येण्याचे प्रमुख कारणे म्हणजे माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम आहे. आतापर्यंत माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेचे दोन टप्पे पूर्ण झाले असून प्रत्येकांच्या घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जाते. आणि सहव्याधी अर्थात को-मोर्बिलिटी रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याच्या उपाययोजना राबवल्या.

या मोहिमेमध्ये मुंबईतील पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात अनुक्रमे ९४ व ९९ टक्के घरांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेमुळे घरोघरी जाऊन महापालिकेच्या पथकाने रुग्णांचा तसेच संभाव्य कोरोना रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने उपचार केले. त्यामुळे रुग्णांचा आकडा मुंबईत कमी होताना दिसत आहे. तर विना मास्कच्या नागरिकांची कारवाई तीव्र करत आतापर्यंत साडेचार लाखांपर्यंतच्या लोकांवर कारवाई करण्यात आली आहे.

करोनाचा प्रार्दुभाव रोखायचा असेल तर मास्क लावणे आणि सुरक्षित अंतर राखणे हे बंधनकारक आहे. त्यामुळे मुंबईकरांवर मास्क लावण्याची सक्ती करत दंडात्मक कारवाई केल्यामुळे करोनाचा आजार नियंत्रणात आला आहे. करोनाची लस हाच एकमेव उपाय नसून नागरिकांनी मास्क लावणे हाच यावर मुख्य उपाय आहे. त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणे इतर राज्यांमध्ये याची सक्ती केल्यास आणि माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम राबवल्यास येत्या काही दिवसांमध्ये मुंबईसह इतर राज्यातील प्रमाण कमी झालेले दिसेल, असे टास्क फोर्समधील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

First Published on: November 26, 2020 7:34 PM
Exit mobile version