मेळघाटात ३० दिवसात ३७ बालकांचा मृत्यू

मेळघाटात ३० दिवसात ३७ बालकांचा मृत्यू

प्रातिनिधिक चित्र

राज्यात बालमृत्यूचे प्रमाण कमी होता होत नाही. गेल्या ३० दिवसात केवळ मेळघाटात मृत्यूमुखी पडलेल्या बालकांची संख्या ३७ असल्याचे उघड झाले आहे. राज्यात कुपोषित असलेल्या बालकांची संख्या २१ हजार इतकी असून अतिकुपोषित असलेल्या बांलकांची संख्याही झपाट्याने वाढत असल्याचे उघड झाले आहे. मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात एका जुलै महिन्यात शून्य ते सहा वर्षं वयोगटातील ३७ बालकांनी अखेरचा श्वास घेतल्याचे उघड झाले.आरोग्य विभागाच्यावतीने आदिवासी भागातील बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी गेल्या आठवड्यात गाभा समितीची मुंबईत बैठक घेण्यात आली होती. यात वाढत्या बालमृत्यूवर चिंता व्यक्त करण्यात आली.

बालमृत्यूची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आखायच्या उपाययोजनांवरही बैठकीत चर्चा करण्यात आली. धारणी आणि चिखलदरा तालुक्यात एप्रिल ते जून या तीन महिन्यात ११४ बालकांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. गतवर्षीपेक्षा ही आकडेवारी अधिक असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. आदिवासी ३० गावांमध्ये आयटी कनेक्टिव्हिटी व्हायची अजून बाकी असल्याचे सांगण्यात आले. अंगणवाडी केंद्रातून सातत्याने खिचडी न देता, इतर पोैष्टिक आहार देण्यात यावा, अशा सूचना करण्यात आल्या. ज्या ठिकाणी बालमृत्यूचे प्रमाण अधिक आहे तिथे विशेष मोहीम राबवण्याच्याही सूचना करण्यात आल्या. नंदुरबार, मेळघाट आणि पालघर आदिवासी जिल्ह्यांमध्ये विविध योजनांचा आढावा बैठकीत घेण्यात आला.

First Published on: September 1, 2018 5:00 AM
Exit mobile version