मुंबईत गतिमंद तरूणीवर बलात्कार, आरोपी ताब्यात

मुंबईत गतिमंद तरूणीवर बलात्कार, आरोपी ताब्यात

प्रातिनिधिक फोटो

गतिमंद मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेत मुंबईत एका नराधामाने तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलगी गरोदर राहिल्यामुळे हा भयानक प्रकार नुकनाच सर्वांसमोर उघड झाला. घडलेल्या प्रकाराबाबत पीडितेला स्वत:ला काहीच सांगता येत नव्हते. मात्र, पोलिसांनी त्यांचं कौशल्य पणाला लावत पीडितेने दिलेल्या पुसट माहितीवरुन तसंच तिने केलेल्या आरोपीच्या अंधुक वर्णनावरुन आठ दिवसांमध्ये आरोपीला अटक केली. कुरार येथे वास्तव्याला असलेल्या या २३ वर्षीय तरूणीच्या पोटात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अचानक दुखायला लागलं. तपासादरम्यान ती गरोदर असल्याचं उघड झालं. याविषयी डॉक्टरांनी कुरार पोलीस ठाण्यामध्ये माहिती दिली आणि त्यांनंतर याप्रकरणाबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. गतिमंद असल्यामुळे तरुणीला हे कृत्य कुणी केलृं हे सांगता येईना. त्यामुळे गुन्हे शाखा युनिट १२ च्या पथकाने याप्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गवस यांच्यासह कदम, मोरे, गायकवाड महिला कॉन्स्टेबल देवळेकर यांची टीम थेट रुग्णालयात जाऊन धडकली.

पोलिसांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा

चौकशीदरम्यान मुळातच पीडितेला लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार म्हणजे काय? हे माहित नसल्याचं समोर आलं. तरीही पोलिसांनी तिच्या आईच्या मदतीने हावभावाद्वारे संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आपल्यासोबत नेमकं काय घडलं आहे, याची पीडित तरुणीला थोडीफार कल्पना आली. त्यानंतर पीडिता सतत तिच्या केसांना हात लावून पोलिसांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करु लागली, ज्याआधारे पोलिसांनी कल्पनाशक्ती पणाला लावून यामागे एखादा नाव्ही असू शकतो असा अंदाज बांधला. या अंदाजावरुन पोलीस तरूणी राहत असलेल्या भागात पोहोचले आणि त्या परिसरातील सलूनमध्ये काम करणाऱ्या काही लोकांना ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान त्यांच्यापैकी २-३ कामगार नुकतंच काम सोडून गेल्याचं पोलिसांना कळलं. त्यामुळे पोलिंसानी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली.

काम सोडून गेलेल्या सर्व कामगारांचे फोटो जमा करुन पोलिसांनी ते पीडित तरूणीला दाखवले. त्यापैकी आरोपी खुर्शिद शाहबुद्दीन अहमद केसर याच्या फोटोवर तिने बोट ठेवले. त्यानंतर जराही वेळ न दवडता पोलीस खुर्शिदच्या मागावर लागले. आठ दिवसांच्या शोधमोहिमेनंतर अखेर पोलिसांनी खुर्शीदला विरारच्या एका सलूनमधून ताब्यात घेतलं. पोलीस चौकशीदरम्यान खुर्शीदने २०१८ च्या गणपती उत्सवादरम्यान सदर गतिमंद तरुणीवर बलात्कार केल्याचे कबूल केले. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात असून, लवकरच त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.

First Published on: January 19, 2019 10:51 AM
Exit mobile version