आरेतील कारशेडविना ‘मेट्रो-३’ अशक्य – अश्विनी भिडे

आरेतील कारशेडविना ‘मेट्रो-३’ अशक्य – अश्विनी भिडे

‘आरे येथे कारशेड उभारल्याशिवाय मेट्रो-३ प्रकल्प होणे अशक्य आहे’, असे प्रतिपादन मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी केले आहे. ‘आरेमधील जागा ही मेट्रो-३ च्या कारशेडसाठी सर्वात सोयीस्कर जागा आहे. मेट्रोचे सर्व संचलन या ठिकाणी करणे शक्य आहे. कांजूरमार्गला मेट्रो कारशेड बांधण्याचा निर्णय घेतला तरी आरे कॉलनीत छोटा कार डेपो करावा लागणार आहे. अन्यथा मेट्रो वाहतूक सुरळीत चालू शकणार नाही’, असेही अश्विनी भिडे म्हणाल्या आहेत. मुंबईतील वाहतूक सुरळीत व्हावी आणि मुंबईकरांना योग्य प्रकार नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी मुंबई आणि उपनगरात साधारणत: ३०० किमी पेक्षाही जास्त मोठे मेट्रोचे जाळे उभारण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, मेट्रो ३ प्रकल्पाअंतर्गत आरे कॉलनी येथे मेट्रो कारशेड तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने आरेतील २६४६ झाडे तोडण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या या निर्णयावर पर्यावरण प्रेमींनी आक्षेप घेत ‘सेव्ह आरे’ मोहिमेअंतर्गत आंदोलन केले आहे. मात्र, ‘२६४६ झाडांच्या बदल्यात २३ हजार ८४६ झाडे लावण्याचा मानस सरकारने ठेवला आहे’, असे भिडे म्हणाल्या आहेत.

हेही वाचा – Video : सहा वर्षाची चिमुकली म्हणतेय, ‘आरे वाचवा!’

आरे कारशेडला विरोध म्हणजे मुंबईकरांचे नुकसान – नितीन गडकरी

आरे येथे कारशेड तयार करण्यासाठी २६४६ झाडांवर कुऱ्हाड पडणार आहे. त्यामुळे आरे येथील ८२ हजार स्थानिकांनी या प्रकल्पावर आक्षेप घेतला आहे. याशिवाय पर्यावरण प्रेमींनी देखील पालिकेच्या वृक्षतोडीच्या निर्णयावर निषेध व्यक्त केला आहे. त्याचबरोबर विविध सामाजिक संघटना, अनेक बॉलिवूड सिनेतारकांनी या विरोधात आवाज उठवला आहे. आरेसाठी ते रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना या प्रकल्पाबाबत एका पत्रकार परिषदेत प्रश्न विचारले असता, त्यांनी वृक्षतोडीच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. पर्यावरण आणि विकास यांच्यात समतोल राखला गेलाच पाहिजे, पण विकासासाठी झाडे तोडणे आवश्यक असेल तर त्याला हरकत घेऊ नये. आरे कारशेडला विरोध हा मुंबईकरांचे नुकसान करणारा आहे, असे गडकरी म्हणाले आहेत.

हेही वाचा – Video: आरे बचावासाठी मुंबईकर पुन्हा एकवटले

भावनिक नको, अभ्यासपूर्ण युक्तिवाद करा – उच्च न्यायालय

आरे दुग्ध वसाहतीशी संबंधित अनेक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. या याचिकांवर सोमवारी सुनावणी नव्हती; मात्र, या विषयावर भावनिक युक्तिवाद करण्यापेक्षा अभ्यासपूर्ण युक्तिवाद करा हे स्पष्ट करण्यासाठी न्यायालयाने विशेष सुनावणी घेतली. सध्या पर्यावरण आणि विकास ही समस्या बनली असून पर्यावरण हानीचे मूल्य कसे ठरवायचे? याबाबत जगभरातील शास्त्रज्ञ, पर्यावरणतज्ज्ञ, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयातर्फे संशोधन सुरु आहे. या दृष्टीने याचिकांवर युक्तिवाद व्हायला हवा. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी मुंबई महापालिका, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा अभ्यास करावा, असे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.


हेही वाचा – आरे कारशेडला ८२ हजार जणांचा विरोध

First Published on: September 10, 2019 9:03 AM
Exit mobile version