दक्षिण भारतावर मंदोस वादळाचे संकट; महाराष्ट्र, गुजरातमध्ये पाऊस

दक्षिण भारतावर मंदोस वादळाचे संकट; महाराष्ट्र, गुजरातमध्ये पाऊस

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली: तामिळनाडू, पद्दुचेरी व आंध्र प्रदेशवर मंदोस चक्रीवादळाचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे या राज्यांना हवामान खात्याने रेड अर्लट दिला आहे. तसेच महाराष्ट्र व गुजरातमध्येही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मंदोस वादळामुळे समुद्र किनाऱ्यांवर वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन सर्तक झाले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून येथे एनडीआरएफचे व एसडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. ४०० जणांच्या १२ तुकड्या येथे तैनात करण्यात आल्या आहेत. सुरक्षेसाठी तामिळनाडुमध्ये शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.

या वादळामुळे कर्नाटक व केरळमधील हवामानात बदल झाला आहे. मंदोस वादळाचा फटका दक्षिण भारतातील राज्यांना बसणार आहे. महाराष्ट्र व गुजरातमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरात दक्षिण-पश्चिम भागामध्ये दोन दिवसांपासून कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत होते. तसेच त्याची तीव्रता सातत्याने वाढत गेली. याचे चक्रीवादळात रुपांतर झाले. चेन्नई शहरापासून हे चक्रीवादळ ७०० किमी अंतरावर होते.

चक्रीवादळाचा परिणाम ११ डिसेंबरपर्यंत राहणार असून ९ डिसेंबरला दक्षिणेकडे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील दक्षिणेकडील अनेक भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गेल्या वर्षी आलेल्या तौक्ते वादळाने गुजरातचे मोठे नुकसान केले. महाराष्ट्राला याचा फटका बसला नाही. तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा हा महाराष्ट्राला बसणार नाही, असे प्रादेशिक हवामान केंद्राने स्पष्ट केले होते. महाराष्ट्रापासून ३५० किमी दूर या चक्रीवादळाचा परिणाम असेल त्यामुळे याचा थेट परिणाम हा महाराष्ट्रात होणार नाही. विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी या परिसरात वारे ताशी ६० किमी ते ७० किमी या वेगाने वाहतील असा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केला होता. मात्र त्यावेळी सावधानतेचा ईशारा म्हणून महाराष्ट्रात तयारी करण्यात आली होती.

डिसेंबर महिन्यात दक्षिण भारताला चक्री वादळाचा अनेकवेळा फटका बसला आहे. त्सुनामीही डिसेंबर महिन्यात आली होती.

 

First Published on: December 9, 2022 10:48 PM
Exit mobile version