प्रवेशाचा तिढा कायम

प्रवेशाचा तिढा कायम

Maratha reservation

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याच्या दिलेल्या निर्णयाने 250 वैद्यकीय विद्यार्थ्यांचे प्रवेश धोक्यात आले. त्यामुळे आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देत प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्याचे आश्वासन सोमवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. मात्र लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आझाद मैदानातून मागे हटणार नाही असा पवित्रा आंदोलक विद्यार्थ्यांनी घेतल्याने तिढा कायम राहिला आहे.

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण लागू नाही. मात्र मराठा आरक्षणांतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांबाबत सरकार निर्णय घेऊ शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निर्णयात म्हटले आहे. त्यापार्श्वभूमीवर आरक्षणाच्या आदेशातील कलम 17.1 नुसार राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार आहे. या अधिकारानुसार सरकारी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी ज्येष्ठ वकीलांची फौज कामाला लावली आहे. दोन ते तीन दिवसांत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. तसेच आरक्षण रद्द केल्याने धोक्यात आलेल्या 250 विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची शेवटची मुदत मंगळवारी संपत असल्याने त्यांचे प्रवेश रद्द होण्याची शक्यता लक्षात घेत प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्यात येईल व त्यासंदर्भातील नोटीस एका तासांत काढण्यात येईल, तसे आदेश सीईटी सेलला दिल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र वैद्यकीय मंत्र्यांनी आश्वासन लिखित स्वरुपात द्यावे या मागणी करत विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. तसेच प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्यासंदर्भातील नोटीस सीईटी सेलकडून काढण्यात आल्यानंतर आम्ही आझाद मैदानातील आंदोलन मागे घेऊ मात्र आमचे आंदोलन कायम राहिल, अशी माहिती आंदोलकर्ते विद्यार्थी डॉ. सुयश पाटील यांनी दिली.

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेमध्ये मराठा आरक्षण लागू होत नसल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आक्रमक झालेल्या मराठा विद्यार्थ्यांनी आझाद मैदानामध्ये आंदोलन छेडले आहे. सात दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक तात्याराव लहाने यांची भेट घेतली. मात्र त्यासंदर्भात कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन अधिक आक्रमक करत सोमवारी राज्यातील मराठा समाजाला मुंबईत आंदोलनात सहभागी होण्यासाठी येण्याचे आवाहन केले. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे सोमवारी सकाळीच राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते अजित पवार व काँग्रेसचे भाई जगताप यांनी त्यांची भेट घेतली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आंदोलक मराठा विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने विद्यार्थ्यांना भेटीसाठी बोलवले. महाजन यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी स्वत: आंदोलनस्थळी येऊन विद्यार्थ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले.

फडणवीस की फसवणीस सरकार – अजित पवारांची टीका
राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाचे सरकार असूनही असे होणे, हे सरकारचे अपयश आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच या विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. मग हे फडणवीस सरकार की, फसणवीस सरकार हा या विद्यार्थ्यांचा प्रश्न चुकीचा ठरतो का? अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. पवार यांनी सोमवारी सकाळी विद्यार्थ्यांची भेट घेतली. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेतून बाद केलेल्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा हक्क फडणवीस सरकारला कोणी दिला? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला.

मराठा धडकलेच नाहीत
वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने सोमवारी राज्यातील मराठा समाजाला आझाद मैदानात येण्याचे आवाहन विद्यार्थ्यांकडून करण्यात आले होते. परंतु सोमवारी काही राजकीय नेते वगळता मराठा समाज मुंबईत धडकलाच नसल्याचे चित्र आझाद मैदानात दिसून आले आहे. राज्यातील काही समन्वयक वगळवता फारसे मराठा समाजाचे नागरिक आझाद मैदानाकडे आले नाहीत.

तर महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही – राज ठाकरे यांचे मत
सध्या सगळीकडे आरक्षणावरून वाद सुरू आहेत. मात्र शाळा महाविद्यालयातील प्रवेश आणि सरकारी नोकर्‍या वगळल्या तर आरक्षणाचा काहीच उपयोग नाही. देशातील 85 टक्के नोकर्‍या खासगी उद्योगात आहेत. महाराष्ट्र अजूनही एक प्रगतीशील राज्य आहे. इतर राज्यांच्या तुलनेत आपल्याकडे नोकर्‍यांचा अधिक संधी आहेत. त्यात राज्यातील उमेदवारांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला तर महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच उरणार नाही, असे ठाम प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केले. ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ठाकरे आले होते.

First Published on: May 14, 2019 5:44 AM
Exit mobile version