माथेरान मिनी ट्रेन लवकरच

माथेरान मिनी ट्रेन लवकरच

माथेरानची मिनी ट्रेन

पर्यटकांची पसंती असलेली मिनी ट्रेन अमन लॉज ते माथेरान दरम्यान येत्या २५ डिसेंबरपूर्वी प्रवाशांच्या सेवेत येण्यास सज्ज होत आहे. नेरळ ते माथेरान या २२ किमीच्या रेल्वे ट्रॅकची दुरुस्ती करण्याच्या कामाचा शुक्रवारपासून श्री गणेशा करण्यात आला. माथेरान ते नेरळ या संपूर्ण मार्गावर मिनी ट्रेनचा आनंद प्रवासी आणि पर्यटक चार महिन्यानंतर घेऊ शकणार आहेत.

यंदा झालेला मुसळधार पावसामुळे नेरळ ते माथेरान दरम्यानचा रेल्वे ट्रक २२ ठिकाणी नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मध्य रेल्वे प्रशासनाने मिनी ट्रेनची सेवा बंद केली होती. मात्र आता नेरळ ते माथेरान या संपूर्ण २२ किलोमीटर रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारपासून हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी ६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. याकरीता ६० कामगार, २ मिक्सर आणि जेसीबी काम करत आहेत. येत्या ४ महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. त्यामुळे मार्च महिन्यापासून मिनी ट्रेन प्रवाशांच्या, पर्यटकांच्या सेवेत सज्ज होईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

रेल्वेने १५ दिवसांपूर्वी माथेरान येथे पीट लाईनचे काम सुरु केले आहे. हे काम येत्या २० ते २५ दिवसांत पूर्ण होईल, त्यानंतर अमन लॉज ते माथेरान शटल सेवा सुरु करण्यात येणार आहे. मिनी ट्रेनला असणारी प्रवाशाची पसंती लक्षात घेता २५ डिसेंबरपूर्वी शटल सेवा चालविण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केलेले आहे. नेरळ ते माथेरानदरम्यान, दिवसभरात ६ फेर्‍या चालविण्यात येतात. मिनी ट्रेनने महिन्याला सुमारे ९० हजार प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे मिनी ट्रेन लवकरात लवकर सुरु करण्याचा मध्य रेल्वेचा प्रयत्न आहे.

First Published on: November 16, 2019 8:40 AM
Exit mobile version