पुुरुषामध्ये वाढतोय मानसिक आजार

पुुरुषामध्ये वाढतोय मानसिक आजार

मुंबईसह राज्यातील पुरुषांचे मानसिक संतुलन ढासळत आहे. कमी पगार, घर खर्च भागवताना होणारी दमछाक, घरांचे थकलेले हप्ते, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, विम्याचे हप्ते, कार्यालयीन कामाचा ताण, प्रेमभंग, अशा विविध कारणांमुळे पुरुषांचा मानसिक आजार सतत वाढत आहे. अशा मानसिक आजारांनी ग्रस्त पुरुषांसाठी ‘हितगुज’ हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून या हेल्पलाईनवर सरासरी ६० टक्के इतक्या संख्येने पुरूषवर्ग संपर्क साधत असल्याचे समोर आले आहे. धकाधकीचे जीवन आणि बदलत्या जीवनशैलीमुळे पुरुषांमध्ये मानसिक समस्यांचे प्रमाण काही वर्षांपासून मोठ्या संख्येने वाढत चालले आहे

अशा पुरुषांचे समुपदेशन करून ‘आयुष्य सुंदर आहे’ असा संदेश देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने 15 मे 2013मध्ये ‘हितगुज’ हेल्पलाईन सुरू केली. या हेल्पलाईनवर दररोज साधारण 100 फोन येतात. विद्यार्थ्यांपासून ते वयस्कर पुरुष ‘हितगुज’मध्ये संपर्क साधत असल्याची माहिती हितगुजच्या समन्वयक आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शुभांगी पारकर यांनी दिली.

मानसिक समस्यांबाबत येणार्‍या अडचणी हेल्पलाईनवर निसंकोचपणे मांडता येतात. फोनवर आपल्या समस्या सांगणे नागरिकांना सोयीस्कर ठरते. हेल्पलाईनवर व्यक्तीची ओळख आणि त्याची समस्या गोपनीय ठेवण्याची जबाबदारी घेतली जाते. त्यामुळे नागरिकांना हेल्पलाईनबाबत विश्वास वाटतो. त्यामुळे ते आपल्या समस्या मनमोकळेपणाने मांडतात, याकडेही डॉ. शुभांगी पारकर यांनी लक्ष वेधले. विशेष म्हणजे आयएएस, आयपीएस, वनविभाग अधिकारी, अभियंता, डॉक्टर्स, विद्यार्थी, नोकरदार वर्ग, प्रतिष्ठित व्यक्ती अशा समाजातल्या सर्व स्तरावरील पुरुषवर्गाचा ‘हितगुज’शी संवाद असतो.

समुपदेशनासाठी आलेले फोन

चिंता – 5.8%
उदासीनता – 5.4%
तणाव – 10.6%
आत्महत्येचा विचार – 0.1%
झोपेची समस्या – 2.2%
व्यसनाधीनता – 2.1%
समाजमाध्यमांचे व्यसन – 1%
लैंगिक समस्या – 2.2%
नातेसंबंध समस्या – 0.3%
मानसिक समस्या – 2.1%
घरगुती छळ – 0.3%
अ‍ॅडजस्टमेंट समस्या – 2.1%
फॉलोअप – 33.7%

हेही करतात संपर्क

आयएएस, आयपीएस, वनविभाग अधिकारी, अभियंता, डॉक्टर्स, विद्यार्थी, नोकरदार वर्ग, प्रतिष्ठित व्यक्ती समुपदेशनासाठी यांची नियुक्ती हेल्पलाईन 24तास सुरु ठेवण्यासाठी येथे मानसशास्त्रीय शाखेतील चिकित्सालयीन ही पदवी प्राप्त केलेले 5 समुपदेशक आणि पी. एच. डी. प्राप्त 1 व्यवस्थापक यांची नियुक्ती केली आहे.

कमी पगार, घरात वृध्द आईवडील, दोन मुले आणि पत्नी, वाढत चाललेला घरखर्च, मुलांचे महागडे शिक्षण आणि आजारपणाचा खर्च भागवणे अवघड होते. त्यातच कार्यालयीन कामाचा ताण असह्य झाल्यामुळे मनात आत्महत्येचा अनेकदा विचार आलेल्या एका व्यक्तीने कॉल केला होता. यावर या व्यक्तीला समुपदेशकांनी दिलेल्या सल्ल्यानंतर त्याने विचार बदलला.

नोकरीमध्ये एका जागी न टिकण्याच्या स्वभावामुळे घरातून ऐकावे लागत असलेले टोमण्याला तो वैतागून मानसिक तणावाखाली होता. त्याला त्याच्या मित्राकडून हेल्पलाईन बाबत कळल्यानंतर त्याने कॉल केला. यावेळी त्याच्या मनातील नकारात्मक विचार दूर करण्यास समुपदेशकांनी मदत केली. त्याला दिलेल्या सकारात्मक संदेशामुळे आज तो एका ठिकाणी नोकरी करत आहे. मधेच काही अडचण आल्यास तो अधूनमधून ‘हितगुज’वर फोनही करतो.

पत्नीशी सतत होत असलेली भांडणे, तिचा उधळपट्टीचा स्वभाव व वाढती महागाई यामुळे घराच्या कर्जाचे, विम्याचे हप्ते व घरखर्च कसा भागवावा यामुळे तणावाखाली आलेल्या एका व्यक्तीने फोन केला.यावर समुपदेशकानी त्याला अडचणीबाबत पत्नीशी बोलण्याचा सांगितले तसेच अन्य पर्यायही सुचवले. यामुळे पती-पत्नीमध्ये एक चांगला संवाद निर्माण झाला आणि समस्या दूर होण्यास मदत झाली.

लग्न झाल्यानंतर मुलगा व सून वेगळे राहू लागले. ज्या मुलासाठी आयुष्य खर्च केले त्यानेच दूर लोटल्याने प्रचंड निराश झालेल्या एका वृध्द व्यक्तीने सर्वांशी संपर्क तोडला. तो आपल्या पत्नीला कोणाशीही संपर्क करु देत नव्हता. त्यांनी अनेक वर्षांपासून घरात सण साजरे करणे बंद केले होते. निराशाजनक आयुष्य जगत असताना त्यांना हितगुजबद्दल कळले. त्यांनी संपर्क साधला असता समुपदेशकांनी त्यांना आयुष्य दुसर्‍यांसाठी नव्हे तर स्वत:साठी जगा, असा सल्ला दिला. त्यांनी फोन केला त्यानंतर 4 दिवसांनी गुढीपाडवा होता. तो त्यांना साजरा करण्यास सांगितला. त्यांनी तो साजरा तर केलाच; पण नंतर फोन करुन त्याबद्दल आनंदाने माहितीही दिली

मुंबई महापालिकेने 022-24131212 या क्रमांकावर हितगुज हेल्पलाईन सुरू केली त्या वेळी आम्हाला घरगुती हिंसाचार, लैंगिक छळ अशा महिलांसंदर्भातील समस्यांबाबत फोन येतील असा अंदाज होता. प्रत्यक्षात मात्र पुरुषांकडूनच मोठ्या प्रमाणात फोन केले जातात. यामध्ये नोकरी गमावण्याची भीती, पगार कमी, घरखर्च भागवण्यातील अडचणींबाबत प्रश्न विचारले जातात हे विशेष. – डॉ. शुभांगी पारकर, समन्वयक, हितगुज हेल्पलाईन

First Published on: September 9, 2018 5:30 AM
Exit mobile version