मीटर रिडिंगचा ‘अडाणी’ कारभार

मीटर रिडिंगचा ‘अडाणी’ कारभार

Meter

दिवसागणिक उभ्या पद्धतीने वाढलेल्या मुंबईत इमारतीच्या संख्येत आणि लोकसंख्येत झपाट्याने वाढ गेल्या काही वर्षात झाली. पण सेवा क्षेत्रातील कामगारांची संख्या मात्र रोडावतच गेली. सध्या अदानीच्या वीज वितरण यंत्रणेत काम करणार्‍या मीटर रिडरची हीच परिस्थिती आहे. एक मिनिटाभराचा श्वासही न रोखता मीटर रिडिंग घेण्याची परिस्थिती सध्या मुंबईतील अदानीच्या मीटर रिडरवर आहे. मुंबई उपनगरातील ग्राहकांची संख्या आणि सध्या अदानीच्या यंत्रणेतील मीटर रिडर यांची संख्या पाहता मिनिटाला एक मीटर रिडिंग घेण्याच आव्हान या मीटर रिडर समोर आहे. मीटर रिडरच्या तोकड्या संख्येमुळेच ग्राहकांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडवर (एईएमएल) आली आहे. एकट्या ऑगस्ट महिन्यातच एईएमएलने तीन लाख वीज ग्राहकांना सरासरी वीजबिल पाठवले होते.

मुंबई उपनगरात पसरलेल्या एईएमएलच्या वीज वितरण क्षेत्रातील 28 लाख वीज ग्राहकांसाठी अवघे 475 मीटर रिडर आहेत. त्यामुळे दिवसाला 227 मीटर रिडर तपासण्याची वेळ मीटर रिडरवर आली आहे. प्रत्येक मिनिटाला नवीन मीटर रिडिंग घेणे शक्य नसल्यानेच सरासरी वीजबिलांची शक्कल एईएमएलमार्फत लढवण्यात आली आहे. मुंबई पूर्व उपनगरात चुनाभट्टी ते मानखुर्द तसेच पश्चिम उपनगरात वांद्रे ते मिरा रोडपर्यंत अदानीचे नेटवर्क हे 400 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरले आहे. तसेच वीज ग्राहकांची संख्या ही 28 लाख इतकी आहे. पण वीज ग्राहकांच्या संख्येच्या तुलनेत मात्र अवघ्या 475 मीटर रिडरकडून हे मीटर रिडिंगचे काम करून घेण्यात येते. सध्याच्या मीटर रिडरच्या संख्येनुसार एका मीटरसाठी सहा हजार मीटर रिडिंगसाठी महिन्यापोटी येतात. तर दिवसापोटी ही संख्या 227 इतकी आहे.या तुलनेत बेस्ट विद्युत पुरवठा उपक्रमाचे वीज वितरणाचे क्षेत्र 85 चौरस किलोमीटर आहे. पण इतक्या कमी क्षेत्रासाठीही 9 लाख 40 हजार ग्राहकांसाठी बेस्टने 425 मीटर रिडर ठेवले आहेत. त्यामुळे बेस्टच्या क्षेत्रात 2164 मीटर महिन्यापोटी एका मीटर रिडरसाठी येतात. दिवसाला मीटर रिडिंगची संख्या 72 इतकी आहे.

ग्राहक वाढले, कामगार तेवढेच
रिलायन्स एनर्जीने मुंबई उपनगरात वीज वितरणाची जबाबदारी घेतली तेव्हा वीज ग्राहकांची संख्या 16 लाख होती. पण आता तुलनेत 28 लाख वीज ग्राहक आहेत. जवळपास 12 लाख वीज ग्राहक वाढले आहेत. पण कामगारांची संख्या ही 3800 इतकीच आहे. मजदूर, निमकुशल कामगार, फ्युजमन, लाईनमन, मीटर रिडर, केबल जॉईंडर, लिपिक, फिटर अशा विविध कामगारातील वर्गवारीत गेली अनेक वर्षे कामगार भरती ही झालेलीच नाही. रिक्त पदांच्या भरतीसाठी आम्ही याआधीही रिलायन्स एनर्जी व्यवस्थापनाकडे पाठपुरावा केला होता. पण कामगार संख्या वाढली नाही. आता एईएमएलच्या बाबतीतही अशीच परिस्थिती आहे. सप्टेंबरमध्ये आम्ही कामगार तुटवड्यामुळे सरासरी वीजबिलासाठी विरोध केला होता. पण व्यवस्थापनाने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. 2016 मध्ये शेवटचा कामगार करार झाला होता. गेल्या अडीच वर्षापासून कामगार भरती मात्र झालेली नाही, अशी माहिती मुंबई इलेक्ट्रिसिटी वर्कर्स युनियनचे महासचिव विठ्ठल गायकवाड यांनी दिली.

अशी आहे कामगारांची गरज
2 हजार मजदूर मुंबईतील वीज वितरण यंत्रणेच्या कामासाठी गरजेचे आहेत. तर 1500 निमकुशल कामगारांची गरज आहे. आणखी 100 लाईनमनची गरज तसेच 150 केबल जॉईंडरची गरज आहे. 28 लाख वीज ग्राहकांची संख्या पाहता आणखी 150 मीटर रिडर यंत्रणेत भरती केले जाणे गरजेचे आहे. तर उपअभियंत्याची गरज 450 इतकी आहे. एकुण तीन हजार ते चार हजार कामगारांची भरती होणे गरजेची आहे. मुंबई उपनगरात नियमित देखभाल दुरूस्तीसाठी पुरेसे कामगारही अदानीकडे नाहीत ही सद्यस्थिती आहे.

मुंबई उपनगरातील वीज ग्राहकांना सरासरी वीजबिल देऊ नका या आशयाचे पत्र आम्ही एईएमएल व्यवस्थापनाला दिले होते. मीटर रिडिंगची नामुष्की ओढावल्यानेच व्यवस्थापनाकडून हा ढिसाळ कारभार करण्यात आला आहे. 27 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान आम्ही रिलायन्स अदाणी करारानंतर असहकार पुकारला होता. त्यासाठी मूळ कारण हे कामगार भरती न करणे हेच होते.– विठ्ठल गायकवाड, महासचिव, मुंबई इलेक्ट्रिसिटी वर्कर्स युनियन

अदानी ईलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड
वीज वितरण क्षेत्र – 400 चौरस किलोमीटर
पूर्व उपनगर – चुनाभट्टी ते मानखुर्द
पश्चिम उपनगर – वांद्रे ते मिरा रोड
वीज ग्राहक 28 लाख
मीटर रिडर 475

First Published on: December 7, 2018 5:14 AM
Exit mobile version