मिठी नदीची १०० टक्के सफाई होण्यासाठी जून महिना उजाडणार?

मिठी नदीची १०० टक्के सफाई होण्यासाठी जून महिना उजाडणार?

संग्रहित छायाचित्र

मुंबई: मुंबईत पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व नद्यांमधील सफाई काम ३१ मे पूर्वी पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेश आहेत. मात्र सध्या नालेसफाईचे काम ८१ टक्के तर मिठी नदी सफाई काम ६७ टक्के झाले आहे. मिठी नदीची उर्वरित ३३ टक्के बाकी असून पुढील १७ दिवसांत सदर काम पूर्ण होणे अवघड आहे. त्यामुळे मिठी नदीची सफाई १०० टक्के पूर्ण होण्यास जून महिना उजाडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात जास्त प्रमाणात पाऊस पडल्यास व त्याच सुमारास समुद्रात मोठी भरती असल्यास उंच लाटा समुद्रात उसळतात. त्यामुळे पावसाचे पाणी सखल भागात साचते. अतिवृष्टी व समुद्रातील मोठी भरती यामुळे मुंबई शहरातील पाणी समुद्रात ज्या ठिकाणी सोडण्यात येते तेथील फ्लड गेट्स बंद करण्यात येतात. परिणामी मुंबईत अतिवृष्टी काळात मुंबईत सखल भागात, रेल्वे मार्गावर काही ठिकाणी पाणी साचते. त्याचा रस्ते व रेल्वे मार्गावरील वाहतुकीवर आणि जनमान्यांवर मोठा परिणाम होतो.

२६ जुलै २००५ रोजी मुंबईत एका दिवसांत तब्बल ९४४ मिमी इतका पाऊस पडला व त्याच वेळी समुद्रात मोठी भरती होती. परिणामी शहर व उपनगरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तसेच, मोठ्या प्रमाणात जिवीत व वित्तीय हानी झाली होती. त्यामुळे सदर घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने तज्ज्ञांची समिती नेमून व आराखाडा तयार करून १०० टक्के नालेसफाई व मिठीसह अन्य नद्यांच्या सफाईच्या कामांना जास्त महत्व देण्यास सुरुवात केली. तेव्हापासून मुंबईत नालेसफाईच्या कामांवर जास्त भर दिला जात आहे. मिठी नदीचे खोलीकरण, रुंदीकरण व सफाईकामे आदी कामे जोमात करण्यात आली. तसेच, या कामांमध्ये दरवर्षी वृद्धी करण्यात येत आहे.

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी, पावसात व पावसानंतर अशा तीन टप्प्यात नालेसफाई कामे करण्यात येतात. पावसाळ्यापूर्वीची शंभर टक्के नालेसफाई कामे मार्च किंवा एप्रिल महिन्यात सुरुवात करून ३१ मे पूर्वी सफाईची कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य असते. यंदा मार्च महिन्यात नालेसफाई कामांना सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत नालेसफाईची ८१ टक्के कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तर मिठी नदीची सफाई ६७ टक्के पूर्ण करण्यात आली आहे. मात्र उर्वरित ३३ टक्के नालेसफाईची कामे पूर्ण करण्यासाठी पुढील १७ दिवसच शिल्लक असून या कालावधीत मिठी नदीचे सफाई काम पूर्ण करणे काहीसे अवघड असल्याचे बोलले जाते. त्यामुळे मिठी नदीमधील सफाई कामे पूर्ण करण्यास जून महिना उजाडणार असल्याचे बोलले जात आहे.

मुंबईतील नाले व नदी यांमधील सफाई कामे

शहर: ६६.९६
पूर्व उपनगर : ८५.०५
पश्चिम उपनगर : ८६.२५
मिठी नदी :  ६६.९३

First Published on: May 13, 2023 10:37 PM
Exit mobile version