Mumbai Metro 3 : दादरमध्ये पहिला ‘ट्विन टनल’ ब्रेकथ्रू

Mumbai Metro 3 : दादरमध्ये पहिला ‘ट्विन टनल’ ब्रेकथ्रू

मुंबई मेट्रो ३ प्रकल्पाचे काम वेग पकडताना दिसत आहे. महीम ते शिवसेना भवनपर्यंतचे भुयारीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. माहीमच्या नयानगर लॉचिंग शाफ्ट मधून भुयारीकरणाला प्रारंभ करणाऱ्या कृष्णा १ आणि कृष्णा २ या टनेल बोअरिंग मशीननी (टीबीएम) दादरपर्यंतचे भुयारीकरण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. एकाच दिवशी अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गावरील बोगद्यातून २ टीबीएम्स मशीन्स बाहेर येणं, हे आजपर्यंतच्या इतिहासात घडलं नव्हतं. त्यामुळेच याचं विशेष कौतुक होत आहे. कुलाबा – वांद्रे – सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेचे काम मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे जलदगतीने करण्यात येत आहे. आज दादर येथील शिवसेनाभवनापर्यंतचं भुयारीकरणाचं काम यशस्वीरित्या पूर्ण झालं आहे. याआधी सीप्झ आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन ठिकाणी भुयारीकरण (ब्रेक थ्रु) पूर्ण करण्यात आले आहे.

 


आजच्या ब्रेक थ्रूचे काम पूर्ण करणाऱ्या कृष्णा १ आणि २ या दोन टनेल बोअरिंग मशीन माहिमच्या नयानगर लाँचिंग शाफ्ट, येथून अनुक्रमे २१ सप्टेंबर २०१७ आणि १८ ऑक्टोबर २०१७ रोजी भूगर्भात उतरविण्यात आल्या होत्या. नयानगर ते दादर मेट्रो स्थानक या अप मार्गावर २ हजार ४९० मीटरचे भुयारीकरण करण्यासाठी, ‘कृष्णा – १’ या टीबीएमसाठी १७७९ इतक्या आरसीसी सिमेंट रिंग्सचा वापर करण्यात आला. तर, याच मेट्रो मार्गातील डाऊन मार्गावर कृष्णा २ या टीबीएमसाठी २४७२ मीटर भुयारीकरणासाठी १७६६ इतक्या आरसीसी रिंग्सचा वापर करण्यात आला. उपलब्ध माहितीनुसार, कृष्णआ १ आणि कृष्णा २ या दोन्ही मशीन्सद्वारे दररोज १० ते १२ मीटर लांबीपर्यंत भुयारीकरण केले जात आहे.

First Published on: January 31, 2019 3:13 PM
Exit mobile version