चिंतन! ‘लाव रे त्या व्हिडिओ’च्या अपयशाचे

चिंतन! ‘लाव रे त्या व्हिडिओ’च्या अपयशाचे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे

‘लाव रे तो व्हिडिओ’ असे वाक्य जरी कानावर पडले तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची लोकसभा निवडणुकीत झालेली भाषणे सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतात. ‘लाव रे तो व्हिडिओ’ या वाक्याने भाजपला अक्षरक्ष: घाम फुटला होता. मात्र लोकसभेचे निकाल हाती आले आणि ‘लाव रे तो व्हिडिओ’ तसेच राज ठाकरेंची भाषणे यांची जादू पुन्हा एकदा चालली नसल्याचे सिद्ध झाले. राज ठाकरेंच्या भाषणाचा आणि लाव रे व्हिडिओचा कोणताही परिणाम मतदारांवर झाला नाही हे निकालावरून स्पष्ट झाले. त्यामुळेच राज ठाकरे आता याचे नेमके कारण काय हे जाणून घेण्यासाठी दौरे करणार आहेत. याची सुरूवात शनिवारपासून होणार असून, ते चार दिवस पुणे दौर्‍यावर आहेत.

…म्हणून राज ठाकरे पुण्यात

लोकसभा निव़डणुकीत भाजपला देशासह राज्यात देखील भरघोस यश मिळाले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी असो वा राज ठाकरेंची भाषणे भाजप-शिवसेनेला रोखू शकली नाहीत. त्यामुळे येत्या काही महिन्यांवर आलेल्या विधानसभेत भाजप आणि शिवसेनेला कसे रोखता येईल याचा अभ्यास राज ठाकरे यांनी आता पासूनच सुरुवात केली असून, राज ठाकरे पुण्यामध्ये चार दिवस प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी शाखाध्यक्षांची शाळा घेणार आहेत. एवढेच नाही तर त्यांच्या मतदारसंघात कसे वातावरण आहे, तसेच आणखी काय करता येईल, आपआपसात काही कार्यकर्त्यांमध्ये मतभेद आहेत का? आणि असले तर ते मतभेद कसे दूर करता येतील यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मनसेकडून देण्यात आली आहे.

हे वाचा – मनसे ‘दुर्मिळ प्रजातीचा पक्ष’

पुण्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात ‘राज’

रविवारी पुण्यात बैठक झाल्यानंतर येत्या काही दिवसात राज ठाकरे ठाणे,नाशिक,पालघर, मुंबईमध्ये राज ठाकरे फिरणार असून, विधानसभेच्या तारखा जाहीर होण्या अगोदर राज ठाकरे सर्व महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याची माहिती मिळत आहे. एवढेच नाही तर येत्या काही दिवसांत राज यांचे दौर्‍याचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर होणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. विशेष बाब म्हणजे विधानसभा निवडणुकीत मनसे आघाडीसोबत जाणार की नाही हे जरी गुलदस्त्यात असले तरी या संपूर्ण दौर्‍यात मनसे एकट्याने लढल्यास किती जागावर जिंकू शकते याचा अंदाज राज ठाकरे घेणार आहेत.

First Published on: June 1, 2019 9:14 AM
Exit mobile version