मनसेला मोठा झटका? शिशिर शिंदे सेनेच्या वाटेवर?

मनसेला मोठा झटका? शिशिर शिंदे सेनेच्या वाटेवर?

सहा नगरसेवकांनी एकगठ्ठा शिवसेनेची वाट धरल्यामुळे मोठा झटका बसलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आणखी एक धक्का बसणार आहे. मनसेचे नेते आणि माजी आमदार शिशिर शिंदे ‘मनसे’ला ‘जय महाराष्ट्र’ करत शिवसेनेचा ‘भगवा’ हाती घेणार असल्याची माहिती सूत्रांनी ‘माय महानगर’ला दिली आहे. ‘मनसे’शी बंडखोरी करून शिवसेनेत दाखल झालेल्या दिलीप लांडे यांच्या मुलाच्या लग्नात शिशिर शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी दीर्घ काळ चर्चा केल्याची माहिती देखील आता पुढे येत आहे. शिशिर शिंदे यांनी ‘मनसे’ला जय महाराष्ट्र केल्यास त्याचा मोठा फटका मनसेला बसेल असे तर्क राजकीय वर्तुळातून वर्तवले जात आहेत. दरम्यान, शिवसेनेकडून ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवण्यासाठी शिशिर शिंदे इच्छुक असल्याची माहिती देखील सूत्रांनी ‘माय महानगर’ला दिली आहे. यावर विचारल्यावर मात्र ‘शिवसेनेत प्रवेश करणार नसल्याचे’ शिशिर शिंदे यांनी सांगितले.

नाराजीचे कारण काय?

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणनीती प्रक्रियेपासून दूर ठेवल्याने शिशिर शिंदे पक्षांतील काही नेत्यांवर नाराज आहेत. त्यानंतर दुखावले गेलेले शिंदे यांनी राज ठाकरेंना पत्र लिहून ‘मनसे नेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा’ अशी विनंती केली. शिंदे यांच्या पत्राला राज ठाकरे यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. शिवाय, मनसेच्या विभागांमध्ये होणाऱ्या बैठकांपासून, कार्यक्रमांपासून शिशिर शिंदे यांना दूर कसे ठेवता येईल? याची पुरेपूर काळजी राज ठाकरे यांनी घेतली असल्याचं सांगितलं जात होतं. परिणामी, शिशिर शिंदे यांच्या मनात अस्वस्थता खदखदत होती. त्यानंतर नाराज शिशिर शिंदे यांनी दिलीप लांडे यांच्या मुलाच्या लग्नात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत हतबलता व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर शिशिर शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार का? यावर आता चर्चांना उधाण आले आहे.

शिंदेंचा ‘मनसे’ प्रवास

शिशिर शिंदे हे मनसेचे विद्यमान सरचिटणीस आहेत. २००९च्या विधानसभा निवडणुकीत शिशिर शिंदे मनसेकड़ून भांडूपमधून आमदार म्हणून निवडून आले. मनसेचे ‘डॅशिंग’ आणि ‘धडाधडीचे’ आमदार म्हणून त्यांची ओळख होती.

राजकीय कारकीर्द

आत्तापर्यंत कुणीकुणी सोडली ‘मनसे’

नाशिकमधील वसंत गिते, मुंबईमधील राम कदम, प्रवीण दरेकर, संजय घाडी, मंगेश सांगळे, हाजी अराफत यासारख्या बड्या नेत्यांनी ‘मनसे’ला जय महाराष्ट्र केला आहे. मनसे सोडलेले सर्व नेते राज ठाकरे यांच्या जवळचे आणि विश्वासू होते. त्यामुळे शिशिर शिंदे यांच्या मनसे सोडण्याच्या निर्णयाचा फटका हा मनसेला बसणार असल्याची चर्चा आहे.

First Published on: June 19, 2018 2:34 PM
Exit mobile version