लवकरच पाऊस मुंबईत धडकणार; हवामान खात्याचा अंदाज

लवकरच पाऊस मुंबईत धडकणार; हवामान खात्याचा अंदाज

संग्रहित छायाचित्र

यंदा नैर्ऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून पाऊस सरासरीइतका बरसणार असल्याचा अंदाज व्यक्त झाला असून, आता तो कधी येणार याचेही संकेत मिळाले आहेत. मोसमी पावसाच्या प्रवासाला अनुकूल स्थिती निर्माण झाल्याने हा पाऊस येत्या १६ मेपर्यंत अंदमान, निकोबार बेटे आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागावर दाखल होऊ शकणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

१६ मे रोजी अंदमानात धडकणार

सर्वसाधारणपणे दक्षिणेकडून म्हणजेच केरळमधून मान्सूनची सुरुवात होते. त्याप्रमाणे जर १ जूनला जर मान्सून उशिरा दाखल झाला तर उर्वरीत भारतातही मान्सूनच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे दरवर्षी अंदमानात २० मे रोजी मान्सून धडकतो. मात्र, तो यंदा १६ मेला येणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तसेन मान्सून अंदमानात दाखल झाल्यानंतर पाच दिवसानंतर श्रीलंका येथे रवाना होतो आणि त्यानंतर आठ दिवसांनी तो केरळमध्ये येऊन धडकतो.

११ जूनपर्यंत मान्सून मुंबईत येणार

स्कायमेटच्या अंदाजानुसार, यंदा देशात मान्सूनचे आगमन उशीरा होण्याची शक्यता आहे. त्यानुसार, जूनच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच ११ जूनपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशात मान्सून ३ ते ७ दिवस लवकर किंवा उशिराने येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर आणि पश्चिम भारतातही १५ जुलैऐवजी ८ जुलैला मान्सून दाखल होईल. राजधानी दिल्‍लीमध्ये यंदा २३ जून ऐवजी २७ जूनला मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता स्कायमेटने दर्शवली आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार यंदा २९ सप्टेंबर ऐवजी ८ ऑक्टोबर पर्यंत मान्सूनचा कालावधी राहणार आहे.

आठवड्याचे अंतर निर्माण झाले

गेल्या काही वर्षांपासून मान्सूनच्या आगमान कालावधीमध्ये बदल झाला आहे. यामध्ये एक आठवड्याचे अंतर निर्माण झाले आहे. पूर्व भारतामध्ये तीन ते सात दिवस उशीरा मान्सून दाखल होणार आहे. तर उत्तर-पश्चिम भारतातही उशीराने आगमन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात पूर्वमोसमी पाऊस

सध्या मे महिना सुरु आहे. त्यामुळे एकीकडे उन्हाचे चटके बसत असताना दुसरीकडे मात्र, पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. गेल्या चोवीस तासांत विदर्भात अनेक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. १३ ते १५ मे या कालावधीत प्रामुख्याने विदर्भात विजांच्या कडकडाटासह आणि मध्य महाराष्ट्रात सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तर १४ मे रोजी कोकण विभागातही पावसाचा अंदाज आहे.


हेही वाचा – ५० दिवसांनंतर आज मुंबईतून धावणार पहिली प्रवाशी ट्रेन


 

First Published on: May 12, 2020 12:48 PM
Exit mobile version