पॅलेटिव्ह केअरमुळे १५ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार

पॅलेटिव्ह केअरमुळे १५ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार

प्रातिनिधिक फोटो

वाढत्या वयात होणाऱ्या आजारांमुळे अनेकदा नातेवाईकही रुग्णांची काळजी घेणं सोडून देतात. त्यातच जर रुग्ण दिर्घकाळ अंथरुणावर खिळलेला असेल तर घरातील प्रत्येक व्यकीला त्याची काळजी घ्यावी लागते. कर्करोग, एचआयव्ही, टीबी, मूत्रपिंडाचे विकार असे दुर्धर आजार झालेल्या आणि शेवटच्या टप्प्यात असलेल्या रुग्णांना मानसिक आधार मिळावा यासाठी पॅलेटिव्ह केअरची सुविधा सुरू करण्यात आली आहे. राज्यातील एकूण १७ जिल्ह्यांमध्ये पॅलिटिव्ह केअरची योजना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत रुग्णाला मोफत औषधोपचारांसह त्याच्या वेदना दूर करून त्याची मानसिक स्थिती कशी चांगली राहिल याची काळजी घेतली जाते. याशिवाय रुग्णाच्या कुटुंबाचं समुपदेशनही केलं जातं. गेल्या ३ वर्षांत अशा तब्बल १५ हजारांहून अधिक रुग्णांवर पॅलेटिव्ह केअर अंतर्गत उपचार करण्यात आले.

दीर्घकालीन आजाराने ग्रस्त आणि आजाराच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या रुग्णांना औषधोपचारांसह काळजी घेण्यासाठी राज्यात पॅलेटिव्ह केअर योजना राबवली जात आहे. या अंतर्गत १५ हजार १४५ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. तर ४ हजार २७२ रुग्णांना घरी पोहचून वैद्यकीय सेवा देण्यात आली आहे.

२०१२ – १३ या साली राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये पॅलेटिव्ह केअरची मोफत सेवा सुरु करण्यात आली. पण, आता एकूण १७ जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प सुरू झाला आहे. त्यानुसार, गेल्या तीन वर्षात १५ हजारांहून अधिक रुग्णांना पॅलेटिव्ह केअरमध्ये उपचार देण्यात आले आहेत.

राज्याच्या आरोग्य संचालनालयाद्वारे मिळालेल्या आकडेवारीनुसार,

वर्ष               बाह्यरुग्ण विभागातील रुग्ण     पॅलटिव्ह केअरद्वारे उपचार        घरपोच उपचार

२०१६ – १७                     १०१५                        २५७                          ३४६

२०१७-१८                       ३,६२१                       ३,७३0                       १,९१७

२०१८-१९-                     ६,४८२                           –                          १९७०

याविषयी अधिक माहिती देताना राज्याच्या आरोग्य संचालनालयाचे कार्यक्रम अधिकारी गणेश सोनुले यांनी सांगितलं की, ‘‘दुर्धर आणि मरेपर्यंत बरे न होणाऱ्या रुग्णांच्या मरणयातना सुखकर व्हाव्या यासाठी पॅलेटिव्ह केअरची योजना सुरू करण्याक आली आहे. प्रायोगिक तत्वावर दोनच जिल्ह्यात ही सुविधा सुरु करण्यात आली होती. २०१८ पासून एकूण १७ जिल्ह्यांमध्ये प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. या सर्व रुग्णांना समुपदेशन केलं जातं. २०१३-१४ या वर्षांत अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा तर २०१४ – १५ या वर्षांत सातारा, नंदूरबार या जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. ३ वर्षांत आतापर्यंत १५ हजार १४५ या केंद्राद्वारे उपचार करण्यात आले. तर ४,२७२ रुग्णांना घरपोच वैद्यकीय सेवा देण्यात आली आहे.’’

” पॅलेटिव्ह केअर केंद्राअंतर्गत रुग्णांची काळजी घेण्यासाठी प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी, चार नर्सेस आणि एक मल्टी टाक्स वर्कर यांनी सहा जणांची टीम काम करत आहे. अनेक लोकांना पॅलेटिव्ह केअर म्हणजे काय? हेच माहित नसल्याने रुग्ण हॉस्पिटलमध्ये येत नाहीत. आमचे डॉक्टर, नर्सेस आणि आशा सेविका जिल्हास्तरावरील गावखेड्यात जाऊन दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांचा शोध घेतात. या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये आणून त्यांच्यावर मोफत औषधोपचार केले जातात. आजारावर मात कशी करता यावी, याबाबत प्रोत्साहन देण्याचं काम केलं जातं. मुलं देखील या पॅलेटिव्ह केअर मध्ये येतात. जसे की, दिव्यांग मुलं, आश्रमशाळेतील मुलं अशा मुलांना त्यांना समजेल अशा भाषेत समुपदेशन केलं जातं. या रुग्णांची काळजी घेतली जाते त्यामुळे त्यांचं जगणं थोडं तरी सुखकर व्हावा यासाठी प्रयत्न केले जातात.”- गणेश सोनुले , राज्य कार्यक्रम अधिकारी , आरोग्य संचालनालय

First Published on: April 16, 2019 10:50 AM
Exit mobile version