विरार स्थानकावर सर्वाधिक रेल्वे क्रॉसिंग

विरार स्थानकावर सर्वाधिक रेल्वे क्रॉसिंग

8 लाख 71 हजार रुपयांचा दंड वसूल

रेल्वे रूळ ओलांडू नका,त्यामुळे जीवाला धोका आहे,अशा प्रकारच्या उद्घोषणा वारंवार रेल्वे स्थानकांमध्ये केल्या जातात. मात्र रेल्वेकडून वारंवार करण्यात येणार्‍या सूचनांकडे प्रवासी दुर्लक्ष करून सर्रासपणे रेल्वे रूळ ओलांडणार्‍यांच्या विरोधात पश्चिम रेल्वेच्या आरपीएफ पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. पश्चिम रेल्वे मागील 4 महिन्यात 3 हजार 553 प्रवाशांवर कारवाई केली असून 8 लाख 71 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

रेल्वे प्रवाशांनी रूळ ओलांडू नये यासाठी रेल्वेतर्फे विविध उपाययोजना करूनही हे प्रकार थांबलेले नाहीत. रेल्वे रूळ ओलांडताना अनेक प्रवाशांनी आपला जीव गमवावा लागला, तरीही हे प्रमाण थांबलेले नाही. यावर पूर्णपणे आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेने रेल्वे रूळ ओलांडणार्‍या विरोधात जनजागृती अभियान सोबतच कारवाई अभियान सुद्धा सुरु केले आहेत. संपूर्ण पश्चिम रेल्वे मार्गवरील मुंबई ते सुरतपर्यंत रेल्वे पोलीस कायद्यानुसार जानेवारी 2018 – एप्रिल 2019 पर्यत बेकायदेशीर रेल्वे रूळ ओलांडणार्‍या 14 हजार 486 प्रवाशांना कारवाई केली आहेत.

तर जानेवारी ते एप्रिल 2019 दरम्यान 3 हजार 553 प्रवाशाना कारवाई केली असून 8 लाख 71 हजार रुपयाच्या दंड वसूल करण्यात आला आहे. सर्वाधिक कारवाई पश्चिम रेल्वेने मुंबई विभागात केली आहे. गेल्या चार महिन्यात रूळ ओलांडणार्‍या 2 हजार 971 जणांवर रेल्वे सुरक्षा बलाने कारवाई केली. त्यामध्ये 7 लाख 65 हजार 550 दंडाची वसुली करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वे सुरक्षा बल यांच्या वतीने देण्यात आली आहे.

नियम मोडणार्‍याची खैर नाही ?
रूळ ओलांडणे हे केवळ बेकायदा नव्हे तर धोकादायकही आहे. मात्र लवकर पोहोचण्यासाठी, जिने ओलांडायचा कंटाळा येतो म्हणून अनेक प्रवासी रेल्वे रूळ ओलांडत असतात. त्यामुळे अपघातांचेही प्रमाण वाढलेले आहे. मुंबई लोकलच्या मार्गावर दिवसाला 10 जणांचा अपघाती मृत्यू होतो. यामध्ये रेल्वे रूळ ओलांडून होणा-या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. याबाबत वारंवार आवाहन करूनही केवळ वेळ वाचवण्यासाठी अनेक प्रवासी रेल्वे नियमांना केराची टोपली दाखवून जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडतात. त्यामुळे रेल्वे रूळ ओलांडताना होणारे मृत्यू रोखण्यासाठी आरपीएफने विशेष मोहीम आखली आहेत. ज्यात जनजागृती बरोबर आता रूळ ओलंडणार्‍या विरोधात आम्ही कारवाईची अशी मोहीम सुरु ठेवणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त एस.आर गांधी यांनी दैनिक आपलं महानगरला दिली .

कोणत्या स्थानकांवर कशी आहे कारवाई

स्थानक प्रवासी दंड

डहाणू रोड 910 181450
विरार 846 165800
पालघर 248 44800
वसई 174 31100
बोरिवली 136 70100
दादर 117 86700
चर्चगेट 81 55800
मुंबई सेंट्रल 79 65600
वांद्रे 62 30200
अंधेरी 30 16200

First Published on: May 10, 2019 4:57 AM
Exit mobile version