हर्षालीसाठी गिर्यारोहणच सर्वकाही

हर्षालीसाठी गिर्यारोहणच सर्वकाही

वसई : तापमान उणे पंधरा डिग्री सेल्सीअस, पावलागणिक होणारा मृत्यूशी सामना, घशाला कोरड पडलेली, जवळचे पाणीही बर्फ झालेले, काळजाचा ठोका चुकत चाललेला, अशी धोकादायक परिस्थिती निर्माण करणार्‍या गिर्यारोहणालाच वसईच्या हर्षाली वर्तकने सबकुछ मानले आहे. वसई तालुक्यातील सागरशेत-मांडलई येथे राहणार्‍या हर्षालीने बँकेतील चांगल्या पगाराची नोकरी सोडून गिर्यारोहणाचा छंद जोपासला आहे.

निसर्गवेडे वडील अशोक बालपणी निसर्गाच्या सानिध्यात फेरफटका मारण्यासाठी नेत असत.उंचच उंच भासणारा चिंचोटी डोंगर वयाच्या 10 व्या वर्षी चढून गेल्यावर त्याहूनही आणखी उंच शिखरे असल्याचे त्यांनी हर्षालीला सांगितले. तिथूनच डोंगर सर करण्याचा ध्यास लागला.निमा आईने पाठीवर थाप मारून आगे बढो, म्हटल्यावर तर तिला आभाळच ठेंगणे वाटले. त्यानंतर शिख़रे सर करण्यासाठी उत्तराखंडच्या नेहरु इन्स्टिट्युटमधून तिने प्रशिक्षण घेतले. 2009 मध्ये सिक्कीमला गिर्यारोहणाला खर्‍या अर्थाने सुरुवात झाली. त्यापुर्वी हर्षालीने गिर्यारोहणात डिप्लोमा आणि डिग्री घेतली. ट्रेकींगचे अतिशय खडतर असे मिलिट्री ट्रेनिंग तिने त्यावेळी घेतले. असे प्रशिक्षण आणि गिर्यारोहणात पदवी संपादन करणारी ती पालघर जिल्ह्यातील एकमेव तरुणी आहे. आतापर्यंत तिने सह्याद्री आणि हिमालयातील अनेक मोहिमा यशस्वी केल्या. पिर पंजाब रेज 17 हजार 352 फुट, हनुमान टिब्बा 19 हजार 450 फुट, माउंट युमान 20 हजार 59 फुट, माऊंट मॅन्थोसा 21 हजार 140 फुट, हिमालयातील डीकेडी 18 हजार 700 फुट आणि उत्तराखंडातील नंदादेवी बेस कॅम्प 14 हजार 500 फुट उंच शिखरांचा त्यात समावेश आहे.

5 सप्टेंबरला हर्षाली जपानचे फुजी शिखर सर करण्यासाठी रवाना झाली आहे. हे शिख़र सर करण्यासाठी संपुर्ण भारतातून जाणार्‍या 8 जणांमध्ये ती महाराष्ट्रातील एकमेव गिर्यारोहक आहे.10 दिवसांचा हा खडतर दौरा आहे.चढाई करताना ऑक्सिजनची कमतरता जाणवल्यामुळे भरपुर पाणी प्यावे लागते. उणे 15 अंश तापमान,बोचरी थंडी, सोसाट्याचा वारा, वातावरणात क्षणाक्षणाला होणारा बदल, त्याचे शरीरावर होणारे विपरीत परिणाम, तीव्र डोकेदुखी, उलट्या होणे, मळमळणे,चेहरा सुजणे अशा अडचणी गिर्यारोहणात येतात. पाण्याची बाटली, रेडी डु ईट,मॅगी असे खाद्य पदार्थ, लहानशी शेगडी, अंथरुण असे पाठीवर पंधरा किलोचे वजन घ्यावे लागते.उणे पंधरा अंशाच्या वातावरणात तर प्रत्येक पावलागणिक श्वास घ्यावा लागतो. या वातावरणात भुक मेलेली असते, मात्र,सतत तहान लागते. सोबतच्या पाण्याचा बर्फ झालेला असतो, त्याला शेगडीवर वितळवून घ्यावे लागते. चालताना, बर्फातील धोकादायक भेंगांवर लक्ष द्यावे लागते.सपाट दिसणार्‍या बर्फाखाली गाडले जाण्याची भिती सतत असते. एका मोहिमेत सहकारी तरुणी अशाच भेगेतून हर्षालीच्या डोळ्यासमोर बर्फाखाली गाडली गेली.तीन तासानंतर तीला बाहेर काढण्यात यश आले,सुदैवाने ती बचावली, असे अनेक थरारक अनुभव हर्षालीने घेतलेत.

तरिही तीचा गिर्यारोहणाचा ध्यास वाढतच चाललाय. सतत जीव धोक्यात घालणार्‍या या छंदासाठी पदरचे लाखो रुपयेही वर्तक कुटुंबाला खर्चावे लागत आहेत. फुजी सर करण्यासाठी तीन लाख रुपये लागलेत. आर्थिक मदत मिळाल्यास हिमालयातील कांचनगंगा सर करण्याचे लक्ष्य तिने डोळ्यापुढे ठेवले आहे. त्यासाठी किमान 30 लाखांचा खर्च येणार आहे. शिख़र आतापर्यंत कोणत्याही मुलीने सर केलेले नाही. कांचनगंगा सर करण्यासाठी भारत शासनाकडून परवानगी दिली जात नाही. त्यामुळे नेपाळ सरकारकडन परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी नेपाळ सरकारला लाखो रुपयांची रॉयल्टी द्यावी लागते. भारत सरकारकडून गिर्यारोहकांना प्रोत्साहन दिले जात नाही. वसई-विरार महापालिकेने आंतर राष्ट्रीय स्तरावर कामगिरी करणार्‍यांना दोन लाखांची मदत देण्याचे जाहीर केलंय. त्यासाठी मे महिन्यात अर्ज दाखल केला. मदत मात्र,अजून मिळालेली नाही.कोणतेही शिख़र करण्यासाठी येणार्‍या अडचणींपेक्षा शासनाच्या कागदी अडचणी मोठ्या असल्याची खंत हर्षालीने व्यक्त केली आहे. फुजीच्या मोहिमेवर जाण्यापुर्वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे स्वतः फोन करून तीला शुभेच्छा दिल्या. इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनीही तिला प्रोत्साहन दिले.अशा व्यक्ती आणि आई-बाबांच्या पाठींब्याची शिदोरी घेवून ती जपानला गेली आहे.

First Published on: September 8, 2018 2:36 AM
Exit mobile version