एमटीएनएल आगीची चौकशी होणे आवश्यक – आशिष शेलार

एमटीएनएल आगीची चौकशी होणे आवश्यक – आशिष शेलार

वांद्रे येथील एमटीएनएलच्या ९ मजली इमारतीच्या तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. (छाया - संदिप टक्के)

वांद्रे पश्चिम येथील एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीची चौकशी होण्याची गरज असल्याचे सांगत याबाबत घटनास्थळाची माहिती मुख्यमंत्र्यांना अवगत करू असे राज्याचे शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आणि स्थानिक आमदार अॅड. आशिष शेलार यांनी सांगितले. अॅड आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघातील एमटीएनएलच्या इमारतीला आग लागल्याचे कळताच त्यांनी तत्काळ मंत्रालयातून घटनास्थळी धाव घेतली. पोलीस, महानगरपालिका आणि अग्निशमन दल यांचे बचाव कार्य सुरु असताना इमारतीच्या परिसरातच आमदार आशिष शेलार तळ ठोकून होते.

शॉटसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

याबाबत प्रसिद्धी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर माहिती देतांना त्यांनी सांगितले की, ”या इमारतीला शॉटसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज संबंधित यंत्रणांनी व्यक्त केला आहे. मात्र अद्याप कोणीही अंतिम निष्कर्षावर आलेले नाही. आगीमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचे मदतकार्य अग्निशमन दलातील जवानांनी तातडीने केले. एकूण ७३ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र या इमारतीच्या मागील भागात निवासी इमारत असून त्यामध्ये काहीजण अडकले, असा अंदाज शेजारच्या इमारतीतील रहिवाश्यांनी व्यक्त केला. सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत ६४ कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात यश आले असून एमटीएनएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि कर्मचारी युनियनने सर्व कर्मचारी बाहेर पडल्याचे सांगितले. त्यानंतर निवासी भागात मात्र जवान रहिवाशी आणि पाळीव प्राणी कोणी अडकले आहे काय? याबाबतचा शोध घेत होते,” असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा – वांद्रे येथील MTNL च्या इमारतीला आग; ८४ जणांची सुखरुप सुटका

दरम्यान या इमारतीमध्ये अग्निरोधक यंत्रणा होती का? स्प्रिंगलर होते का? सर्व्हर रूम चौथ्या मजल्यावर प्लॅनप्रमाणे होता का? फायर ऑडीत झाले होते का? आपत्कालीन सूचना देणारी यंत्रणा होती का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. त्यामुळे या संपूर्ण घटनेची चौकशी होण्याची गरज आहे. मी याबाबत घटनास्थळाचा व मदतकार्याचा आढावा घेतला असून अधिकाऱ्यांकडून माहितीही घेतली आहे. याबाबत मी तत्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अवगत करेन.
अॅड. आशिष शेलार, स्थानिक आमदार

First Published on: July 22, 2019 9:51 PM
Exit mobile version